ताज्या बातम्या

एसआयआर मोहिमेतील त्रुटी दूर करून निष्पक्ष व पारदर्शक मोहिम राबवा, फॉर्म ७ च्या दुरुपयोगाला आळा घाला – खा. वर्षा गायकवाड

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रातील हवामान, धार्मिक सण-उत्सव व इतर स्थानिक परिस्थिती यांचा योग्य विचार करूनच SIR मोहीम राबवली जावी. पुनर्विकास प्रकल्पांमुळे इतर भागांत स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, फॉर्म ७ चा दुरुपयोग थांबवून प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करावे, या मागण्या निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी मंत्री नसीम खान, आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, आमदार भाई जगताप, चरणसिंग सप्रा, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, अखिलेश यादव, रवी बावकर, जावेद जुनेजा, मंदार पवार, हिना गजाली आदी उपस्थित होते. मुंबईत सध्या सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रियेबाबत यावेळी रचनात्मक चर्चा करण्यात आली.

या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, संविधानाने १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, हा अधिकार हिरावला जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. मुंबईत मॅपिंगचे काम खूप कमी प्रमाणात झालेले आहे. रिटर्निंग ऑफिसर व बीएलएची संख्या कमी आहे. लोकप्रतिनिधींशी बैठक घेतली पाहिजे. पुनर्वसन व स्थलांतरीत लोकांची नावे वगळली जाणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर दुसरीकडे आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपुरला पायी चालत जातात, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, याकडेही लक्ष दिले पाहिजे.

महाराष्ट्रात पुढील तीन वर्षांत कोणतीही मोठी निवडणूक नसल्याने SIR प्रक्रिया घाईगडबडीत न राबवता पुरेसा वेळ देऊन पार पाडावी. कोणत्याही नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळण्यापूर्वी किमान ७ दिवसांची लेखी नोटीस देऊन त्याला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी. संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वसमावेशक असावी. प्रत्येक मतदान केंद्रावर सर्व राजकीय पक्षांच्या अधिकृत प्रतिनिधींना सहभागी करून पारदर्शकता सुनिश्चित करावी. निष्कासित इमारती, चाळी आणि झोपडपट्ट्यांमधून स्थलांतरित झालेल्या नागरिकांचे मतदानाचे अधिकार अबाधित राहण्यासाठी विशेष व्यवस्था करावी. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे बोगस नावे समाविष्ट केल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. पावसाळ्याचा वितार करून एसआयआर मोहिमेच्या वेळापत्रकाचा पुनर्विचार करावा असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर निवडणूक अधिकाऱ्यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले

Scroll to Top