ताज्या बातम्या

वारकरी सेवेसाठी माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा स्तुत्य उपक्रम; आळंदी-पंढरपूर वारीत अल्पोहार वाटप

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या सेवाभावी परंपरेला पुढे नेत माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळ, निपाणी (मुंबई) यांच्या वतीने आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी अल्पोहार वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी आळंदी-दिघी रोड, पुणे येथे संपन्न होणार आहे.
यंदा या सेवाभावी उपक्रमाचे ११ वे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे हजारो वारकऱ्यांची सेवा करण्याचा मंडळाचा संकल्प आहे. संत परंपरेच्या या पवित्र वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांना अल्पोहाराचे वाटप करून त्यांची सेवा करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.
हा पवित्र संकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, भाविक आणि हितचिंतकांनी धार्मिक भावना व उदार अंतःकरणाने या सेवाकार्यात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
उपक्रमासाठी आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या भाविकांनी उपलब्ध करून देण्यात आलेला QR कोड/बारकोड स्कॅन करून आपले योगदान द्यावे. आपल्या सहकार्यामुळे वारकरी सेवेसाठीचा हा उपक्रम अधिक व्यापक, भव्य आणि यशस्वी होण्यास मदत होणार आहे.
वारकरी सेवा हीच ईश्वरसेवा मानली जाते. माऊलीच्या पालखी सोहळ्यात केलेला दानधर्म आणि सेवाकार्य हे पुण्यप्राप्तीचे माध्यम मानले जाते. त्यामुळे या सेवाभावी उपक्रमात सहभागी होऊन वारकऱ्यांच्या सेवेसाठी हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Scroll to Top