ताज्या बातम्या

पत्रकार सहकारी गृहनिर्माण सोसायटीत चोरीचा प्रयत्न; ज्येष्ठ पत्रकाराला धक्का देऊन चोर पसार

मुंबई, चेंबूर : टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन टिळक नगर, चेंबूर येथील पत्रकार सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अज्ञात चोरट्याने फ्लॅट क्रमांक बी-४७/४८ चे कुलूप तोडून लोखंडी साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरी रोखण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ पत्रकाराला धक्का देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही सोसायटी जुनी व जीर्णावस्थेतील असून इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. काल दुपारच्या सुमारास सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक बी-४७/४८ येथे अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून आत प्रवेश केला. लोखंडी पाईप व इतर साहित्य चोरी करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
दुपारची वेळ असल्याने सोसायटीमध्ये फारशी वर्दळ नव्हती. मात्र, दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकारांना संशयास्पद आवाज ऐकू आला. त्यांनी तातडीने तिसऱ्या मजल्यावर जाऊन पाहणी केली असता संबंधित चोरट्याने त्यांना धक्का देऊन खाली पाडले आणि मुद्देमालासह तेथून पळ काढला.
या घटनेनंतर ज्येष्ठ पत्रकार मुकादम यांनी सोसायटीच्या वतीने टिळक नगर पोलीस ठाण्यात निवेदन दिले. मात्र, पोलिसांनी प्राथमिक स्वरूपाची एनसी (अदखलपात्र तक्रार) नोंदवून पुढील चौकशी सुरू असल्याचे सांगितले. घटनेचा अधिक तपास टिळक नगर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, यापूर्वीही एका अज्ञात इसमाने चाकूचा धाक दाखवत सोसायटीतील पत्रकारांना धमकावल्याची घटना घडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तसेच सोसायटीच्या बाहेर असलेल्या कथित अनधिकृत पानपट्टीवर मोठ्या प्रमाणात व्यसनी व्यक्तींची वर्दळ असते. त्यामुळे रहिवाशांना सातत्याने त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार सोसायटीने केली आहे.
या पार्श्वभूमीवर चोरीच्या घटनेतील आरोपीचा तातडीने शोध घेण्यात यावा, सोसायटी परिसरात पोलीस गस्त वाढवावी तसेच अनधिकृत व्यवसाय आणि असामाजिक घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे.

Scroll to Top