कराड( ज्ञानेश्वर शेवाळे) : वारस हक्काची नोंद मंजूर करून सातबाऱ्यावर नावे चढविण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या एका महिला तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहाथ पकडले. २,५०० रुपयांची लाच स्वीकारताना करण्यात आलेल्या या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
अर्चना रामचंद्र गावडे (वय ४०) ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) रा. विश्रामनगर, भारती विद्यापीठमागे, मलकापूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या आजीच्या निधनानंतर त्यांच्या नावावरील चचेगाव येथील जमिनीच्या वारस नोंदीसाठी तक्रारदाराच्या वडिलांनी जानेवारी महिन्यात अर्ज दाखल केला होता. संबंधित नोंद मंजूर करून सातबाऱ्यावर तक्रारदाराच्या वडिलांसह इतर वारसांची नावे समाविष्ट करण्याच्या
प्रक्रियेसाठी तलाठी अर्चना गावडे यांनी २,५०० रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी २ व ३ जून रोजी करण्यात आली. चौकशीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीच्या सातारा पथकाने सापळा रचला. बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईत अर्चना गावडे यांनी पंचांसमक्ष २,५०० रुपयांची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांनी सापळा कारवाईचे नेतृत्व केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील करीत आहेत.



