भोर : ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मंत्री आणि भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अनंतराव नारायणराव थोपटे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
११ जानेवारी १९३३ रोजी जन्मलेल्या अनंतराव थोपटे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत विकासाभिमुख आणि जनसामान्यांशी नाळ जपणारे नेतृत्व म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. भोर विधानसभा मतदारसंघातून ते तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ग्रामीण विकास, शिक्षण, सिंचन, रस्ते आणि शेतकरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले.
महाराष्ट्र शासनात त्यांनी सुमारे १४ वर्षे विविध खात्यांचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. शिक्षणमंत्री म्हणून राज्याच्या शैक्षणिक विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी विकासकामांना गती दिली.
काँग्रेस पक्षाशी अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठावंत राहिलेल्या थोपटे यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी मोठे योगदान दिले. संयमी, अभ्यासू आणि सर्वपक्षीय नेत्यांशी सुसंवाद राखणारे लोकनेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक अनुभवी मार्गदर्शक गमावला असून पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण अध्याय संपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.




