अकोले : अकोले तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ कोतुळ परिसरातील अबीटखिंड (भोजनेवाडी) येथे शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संगीत विद्यालयाच्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रामनाथ भोजने यांनी दिली.
“तालुका तिथे संगीत विद्यालय” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठानकडून राज्यभर उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अबीटखिंड (भोजनेवाडी) येथे संगीत विद्यालय उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या विद्यालयासाठी स्थानिक ग्रामस्थांनी तब्बल सात गुंठे जमीन दान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.
जमीन दान करणाऱ्यांमध्ये रामनाथ भोजने, मुकिंदा भोजने, धोंडिभाऊ भोजने, वाळीबा भोजने, किसन भोजने तसेच स्व. रंगनाथ भोजने, स्व. बुधाबाई भोजने, स्व. पांडुरंग भोजने आणि स्व. रावजी भोजने यांचा विशेष उल्लेख करण्यात येत आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, उरण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. भावना घाणेकर, आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव देवराम मुंढे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण संस्थेचे प्रमोद मोरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजारामबुवा शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार असून, शहीद राजेंद्र भोजने पटांगण, अबीटखिंड (भोजनेवाडी) येथे रविवार, दि. १ जून रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यास नागरिक, ग्रामस्थ, कला रसिक व संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रामनाथ भोजने यांनी केले आहे.



