ताज्या बातम्या

विदर्भकन्या सौ. सरिता विजय वाकोडे : शिवसेनेवर डॉक्टरेट मिळविणारी रणरागिणी!

विशेष लेख : गिरणी आणि अन्य आस्थापना यांच्या कामगारांमधील सुमारे १०६ बहाद्दर बांधवांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर महत्प्रयासाने १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली परंतु मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता. मुंबई या महाराष्ट्राच्या राजधानीत अमराठी अधिकारी मोठ्या प्रमाणावर दिसून येत होते. अशा वेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आलेले बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर १३ ऑगस्ट १९६० रोजी ‘मार्मिक’ हे जगाच्या इतिहासातील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ख्यातकीर्त झालेले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते या ‘मार्मिक’चे प्रकाशन केले. बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’मधून अमराठी लोकांची यादी जाहीर केली आणि त्या स्तंभाला ‘वाचा आणि थंड बसा’ हे चपखल आणि चीड आणणारे शीर्षक दिले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी थोर समाजसुधारक केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना विचारले की, अरे बाळ, तू केवळ ‘वाचा आणि थंड बसा’ लिहीत बसणार की पुढे आणखी काही करणार आहेस ? मग प्रबोधनकार ठाकरे ऊर्फ दादा यांच्या सूचनेनुसार ‘शिवसेना’ ही मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना स्थापन केली. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे आमच्या एक वैदर्भीय सुकन्या सौ. सरिता विजय वाकोडे यांनी गेल्या सुमारे सहा वर्षांपासून शिवसेनेवर पीएचडी करुन डॉक्टरेट मिळविण्याचा प्रयत्न केला. पूर्वाश्रमीच्या कुमारी सरला रामराव पाटील यांनी अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला शिवसेनेवरील एक भला मोठा अभ्यासपूर्ण प्रबंध सादर केला. ‘शिवसेनेच्या मानवतावादी कार्याचे ऐतिहासिक अध्ययन’ असे या प्रबंधाचे शीर्षक या आहे. या आमच्या सुकन्येचा हा प्रबंध संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने स्वीकारून त्यांना पीएच.डी. पदवी बहाल केली. २२ सप्टेंबर २०२५ रोजी सौ. सरिता विजय वाकोडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला हा प्रबंध सादर केला आणि २६ मे २०२६ रोजी सौ. सरिता विजय वाकोडे यांना समारंभपूर्वक डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. १३ डिसेंबर २०२५ रोजी विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री श्री नितीन जयराम गडकरी यांच्या शुभहस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित अनंत पवार तसेच विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘विधानपरिषदेने संमत केलेली विधेयके, ठराव आणि धोरणे’ यांना मित्रवर्य विलास मुकादम, किशोर आपटे आणि मी अशा तिघांनी संपादित केलेल्या सुमारे ९०० हून अधिक पृष्ठांच्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. विधानमंडळ सचिव सौ. मेघना तळेकर इटकेलवार आणि वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रंथ तयार करण्यात आला. या ग्रंथाच्या ऐतिहासिक अभूतपूर्व प्रकाशनानंतर मित्रवर्य बाबासाहेब कोटकर यांच्या कुशल सारथ्याने हाकण्यात येणाऱ्या वाहनाने पत्रकारितेतील मित्रवर्य श्री सत्यवान ताठरे, संजीव उपरे आणि अस्मादिक (योगेश वसंत त्रिवेदी) आम्ही नागपूर येथून वर्धा या बापूंच्या पावनभूमीत ज्येष्ठ मित्रवर्य श्री. प्रकाश कथले यांची भेट घेतली. पारिवारिक मंगलमय वातावरणात त्यांचा कौटुंबिक सन्मान स्वीकारला आणि थेट अकोला गाठले. सुकन्या सौ सरिता विजय वाकोडे यांनी सहपरिवार आम्हा सर्वांचे औक्षण करून शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सन्मानित केले, पंचपक्वान्नाची व्यवस्था करण्यात आली होती. या भेटी दरम्यान सौ. सरिता विजय वाकोडे (पाटील),
श्री. विजय मधुकरराव वाकोडे, कु. मृणाल विजय वाकोडे, चि. स्वराज विजय वाकोडे, मोठे भाऊ श्री. दिगंबर मधुकर वाकोडे,
सौ. मनीषा दिगंबर वाकोडे,
चि. आनंद दिगंबर वाकोडे हा संपूर्ण प्रवास परिवार आमच्या स्वागतासाठी सज्ज होता. सौ. सरिता आणि त्यांच्या भगिनी या सख्ख्या बहिणी, सख्ख्या जावा आहेत, हे कळताच मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची आठवण झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ. मीनाताई आणि श्रीकांत ठाकरे यांच्या पत्नी सौ. कुंदाताई यासुद्धा सख्ख्या बहिणी, सख्ख्या जावा आहेत, ही गोष्ट बोलून दाखविली. याच वेळी सौ. सरिता विजय वाकोडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला सादर केलेल्या प्रचंड मोठ्या प्रबंधाची प्रत अवलोकन करायला मिळाली. ज्येष्ठ पत्रकार श्री संदीप आचार्य यांनी सौ. सरिता वाकोडे यांना सहकार्य केले असल्याने आम्ही तेथूनच संदीप आचार्य यांच्या समवेत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आणि बोललो. गेल्या दोन वर्षांपासून सौ. सरिता वाकोडे यांनी मुंबईमध्ये दादर ते दहिसर अशा सर्वच ठिकाणी भेटी देत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य, शिवसेना नेते माजी मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना नेते खासदार श्री अरविंद सावंत, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, झुंजार माजी आमदार नीला देसाई, माजी आमदार आणि शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, माजी आमदार, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, मागाठाणे मित्र मंडळ, प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय, शिवसेनेच्या पदाधिकारी रेखा बोऱ्हाडे, रोहिणी चौगुले अशा अनेकांची भेट घेतली. संपूर्ण माहिती संकलित केली. माझे ‘पासष्टायन’, ‘गुरुजी’ ही पुस्तके सौ. सरिता वाकोडे यांना दिली. योगेंद्र ठाकूर यांचीही पुस्तके त्यांना उपलब्ध करून देण्यात आली. मित्रवर्य हर्षल प्रधान यांनीसुद्धा सहकार्य केले. या दोन-तीन वर्षांच्या प्रदीर्घ काळात प्रचंड मेहनत, कुटुंबाचा योग्य तो सांभाळ, आलेल्या संकटांना धीराने तोंड देत कंबर कसून लिखाण केले. वेळोवेळी बाबा, मला ही माहिती पाहिजे असे हक्काने सांगून ती माहिती मिळविण्याचे (ते कसब सरिता यांच्या चांगलेच अंगी भिनलेले आहे) काम केले. 🚩 महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि मानवतावादी इतिहासात अभिमानास्पद क्षण 🚩

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते शिवसेनेच्या मानवतावादी कार्यापर्यंतचा इतिहास, मराठी अस्मिता, सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जतन आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या विचारधारेचा सखोल अभ्यास करणारा
“शिवसेनेच्या मानवतावादी कार्याचे ऐतिहासिक अध्ययन : विशेष संदर्भ मुंबई विभाग (कालखंड इ. स. १९६० ते २०१०)”
हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि इतिहास विषयातील संशोधन प्रबंध सादर करून
डॉ. सरिताताई विजय वाकोडे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला संशोधक ठरल्या आहेत.

सुमारे ४५० पानांच्या या विस्तृत संशोधनामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भाषावार प्रांतरचना, मराठी अस्मितेचा संघर्ष, शिवसेनेची स्थापना, संघटनात्मक विस्तार, सामाजिक कार्य, सांस्कृतिक चळवळी आणि महिला सक्षमीकरणाचा व्यापक ऐतिहासिक अभ्यास करण्यात आला आहे.

या संशोधनामध्ये
शिवसेनाप्रमुखांपासून शिवसैनिकांपर्यंत आणि शाखांपासून मातोश्रीपर्यंत शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.

शिवसेनेची स्थापना, ‘मार्मिक’ साप्ताहिकाची भूमिका, मराठी युवकांच्या प्रश्नांवरील आंदोलने, दसरा मेळावे, हिंदुत्वाची भूमिका, मराठी माणसासाठीचा संघर्ष आणि मानवतावादी कार्याचा तपशीलवार आढावा या प्रबंधात मांडण्यात आला आहे.

🚩 “मानवतावादी कार्य म्हणजे शिवसेना” या संकल्पनेअंतर्गत :
▪️ स्वच्छ मुंबई हरित मुंबई
▪️ बॉम्बेचे मुंबई नामांतर
▪️ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव विमानतळाला देण्यासाठीचा लढा
▪️ महाराष्ट्र कर्नाटक मराठी सीमावाद
▪️ चित्रपटसृष्टीतील प्रश्न
▪️ शाखा म्हणजे प्रतिन्यायमंदिरे
▪️ रक्तदान शिबिरे
▪️ आरोग्य शिबिरे
▪️ रुग्णवाहिनी व शववाहिनी सेवा
▪️ झोपडपट्टी पुनर्वसन
▪️ एक रुपयात झुणका भाकर
▪️ मराठी युवकांना रोजगार
▪️ लोकाधिकार समिती महासंघ
▪️ कामगार सेना
▪️ सामाजिक व आपत्ती व्यवस्थापनातील योगदान

यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.

🚩 शिवसेनेच्या सांस्कृतिक कार्यामध्ये :
▪️ मराठी भाषेचे रक्षण
▪️ मराठी लोककला संवर्धन
▪️ गणेशोत्सव, दहीहंडी, शिवजयंती
▪️ मराठी चित्रपटांना प्रोत्साहन
▪️ सांस्कृतिक मंच व नाट्यमंदिरे
▪️ कवी, शाहीर, कलाकार यांना पाठबळ

या विषयांचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे.

🚩 महिला आघाडीच्या कार्यामध्ये :
▪️ रणरागिणीची संकल्पना
▪️ महिलांचे सक्षमीकरण
▪️ आरोग्य शिबिरे
▪️ ममता दिन
▪️ पाककला, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा
▪️ हळदीकुंकू, मंगळागौर
▪️ मातोश्री महिला प्रतिष्ठान
▪️ महिलांसाठी शाखांचे माहेरघर म्हणून कार्य

यांचा अभ्यास संशोधनामध्ये करण्यात आला आहे.

एका महिलेने शिवसेनेच्या विचारसरणी, समाजकारण, मानवतावादी कार्य आणि मराठी अस्मितेवर एवढ्या व्यापक स्वरूपात पीएच.डी. संशोधन पूर्ण करणे ही निश्चितच
🚩 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी स्वाभिमानाची आणि गर्वाची बाब
मानली जात आहे.

या वेळी शिवसेना पक्षाचे उपनेते तथा माननीय आमदार नितीन बापू देशमुख यांनी डॉ. सरिताताई वाकोडे यांचे अभिनंदन करताना सांगितले —

“आपल्या जिल्ह्यातील महिला जिल्हा संघटिका म्हणून त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. अशा रणरागिणी शिवसैनिकेचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे.”

मराठी अस्मिता, समाजकारण, मानवतावादी विचार आणि संघटनात्मक इतिहास यांचा दस्तऐवज ठरणारा हा संशोधनग्रंथ महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासात महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
डॉ. सरिता विजय वाकोडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! ‘सामना’मधील आमचे जुने सहकारी श्री. अनंत गुरव तसेच अमरावती येथील डॉ. मनीष देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे अग्रणी थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर डॉक्टरेट मिळवली आहे तर माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर गजानन जोशी यांनी शिवसेनेवर प्रबंध लिहिला आणि त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली. ज्येष्ठ पत्रकार श्री सुकृत खांडेकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक विद्यापीठातून दैनिक ‘सामना’ या राजकीय पक्षाच्या मुखपत्रावर सुमारे चारशे पानांचा प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवली. आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या अकोला जिल्हा महिला संघटक म्हणून झुंजार रणरागिणी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या सौ. सरिता विजय वाकोडे यांना शिवसेनेच्या मानवतावादी कार्याचे ऐतिहासिक अध्ययन : विशेष संदर्भ मुंबई विभाग (कालखंड इ. स. १९६० ते २०१०)” या विषयावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने डॉक्टरेट प्रदान करीत सौ. सरिता विजय वाकोडे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या राजमुकुटात सोनेरी शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. मातोश्री याची निश्चितच योग्य ती दखल घेईल, हे निःसंशय! सुकन्या सौ. सरिता विजय वाकोडे यांचे परिवारासह मनःपूर्वक अभिनंदन आणि सौ. सरिता यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, ही गजाननाचरणी प्रार्थना तसेच भावी वाटचालीसाठी खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा.

– योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).

Scroll to Top