कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्याने विविध घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले असून अनेक योजनांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. ग्रामीण भागातील गरजू व लाभार्थी कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती कराडच्या माध्यमातून प्रभावीपणे काम सुरू आहे.
रमाई आवास योजनेत कराड तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच मोदी आवास योजनेत द्वितीय क्रमांक, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमध्ये तृतीय क्रमांक, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत तृतीय क्रमांक, तर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत चतुर्थ क्रमांक मिळवत कराड तालुक्याने उल्लेखनीय प्रगती नोंदवली आहे.
याबाबत माहिती देताना पंचायत समिती कराडचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी सांगितले की, कराड तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी मंजूर घरकुलांचे काम तातडीने सुरू करून वेळेत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक तसेच घरकुल टीम यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कराड तालुका जिल्ह्यात अग्रेसर राहिला असून भविष्यातही ही परंपरा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




