ताज्या बातम्या

महागाईने त्रस्त जनतेवर पेट्रोल-डिझेलची दरवाढ अन्यायकारक, दरवाढ तात्काळ मागे घ्या – खा. वर्षा गायकवाड

मुंबई : महागाईने जनता त्रस्त असताना पेट्रोल डिझेलची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटण्याचा प्रकार आहे. मागील ११ दिवसात पेट्रोल डिझेलचे दर प्रति लिटर ८ रुपयांनी वाढले आहेत. ही इंधन दरवाढ सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करणारी असून केंद्रातील भाजपा सरकारने ही अन्यायकारक दरवाढ तात्काळ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

इंधन दरवाढीवर बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे पेट्रोल डिझेलचा आवश्यक तेवढा साठा देशात आहे हे सांगत होते. पण विधानसभा निवडणुका होताच पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरु केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकानंतर पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणार असा इशारा दिला होता आणि राहुल गांधी पुन्हा एकदा खरे ठरले, मोदी सरकारने निवडणुका होताच इंधन दरवाढ केली. मागील महिन्यातच एलपीजी सिलेंडरच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या. व्यावसायिक सिलेंडरच्या किमती तर दुप्पट केल्याने हॉटेलसह खाद्य पदार्थ बनवणारे छोटे व्यवसाय संकटात आले व खाद्य पदार्थांचे दरही वाढले आता पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत, त्यामुळे महागाई आणखी वाढेल. युपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहनसिंह यांनी सबसीडी देऊन जनतेला दिलासा दिला आणि महागाईची झळ बसू दिली नाही, पण मोदी सरकार मात्र जनतेला कोणत्याच प्रकारे दिलासा देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाई, बेरोजगारी, यासह जनतेच्या प्रश्नात काहीच स्वारस्य नाही. जनता पिचलेली असताना पंतप्रधान मात्र विदेशी दौरे करत चॉकलेट वाटत फिरत आहेत, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पेट्रोलचा पर्याप्त साठा आहे हे सांगत आहेत पण राज्यातील काही भागात पेट्रोल पंप बंद आहेत. आजच काही प्रसारमाध्यांनी मुंबईतील दादर सायनमध्येही पेट्रोल पंप बंद असल्याच्या बातम्या दिल्या. पेट्रोल-डिझेल टंचाईच्या झळा राजधानी मुंबईपर्यंत पोहचल्या तरी मुख्यमंत्री फडणवीस जागे झालेले दिसत नाहीत. खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल डिझेलची टंचाई होणार नाही व महागाईची झळ जनतेला पोहचणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या..

Scroll to Top