मुंबई : बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, कार्पोरेट कंपन्यांकडून निर्माण होत असलेली अव्यावसायिक स्पर्धा आणि औषध व्यवसायावरील वाढते संकट याच्या निषेधार्थ अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना (AIOCD) यांच्या वतीने दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला महाराष्ट्रासह देशभरातील औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली मेडिकल दुकाने बंद ठेवली. मुंबईतील आझाद मैदान येथे हजारो केमिस्ट व्यापाऱ्यांनी उपस्थित राहत सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनाचे नेतृत्व AIOCD चे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर, मुंबई झोनचे अध्यक्ष हुकुमराज मेहता, मुंबई केमिस्ट असोसिएशनचे प्रसाद दानवे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की, औषध व्यवसाय हा Drugs and Cosmetics Act 1940 आणि Rule 1945 अंतर्गत चालवला जातो. मात्र ऑनलाईन औषध विक्रीबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट कायदेशीर तरतूद नसताना देशभरात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे. केंद्र सरकारने २०१८ मध्ये GSR 817(E) नोटिफिकेशन जारी केले होते, परंतु त्याचे कायद्यात रूपांतर झालेले नाही. तसेच या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीस स्थगिती दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी जारी करण्यात आलेले GSR 220(E) नोटिफिकेशन अद्याप रद्द करण्यात आले नसल्याने ऑनलाईन कंपन्या त्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मोठ्या कार्पोरेट कंपन्या २० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत देत पारंपरिक औषध विक्रेत्यांसमोर असमतोल स्पर्धा निर्माण करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Drug Price Control Order (DPCO) 2013 अंतर्गत नियंत्रित औषधांवर होलसेलरला ८ टक्के व रिटेलरला १६ टक्के नफा निश्चित करण्यात आला आहे. मात्र ऑनलाईन कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात येत असल्याने देशातील सुमारे १२.५० लाख औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
संघटनेने सरकारकडे अनेकदा निवेदने देऊन तसेच संबंधित मंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे आंदोलनात्मक भूमिका घेत देशव्यापी बंद पुकारण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. सरकारने तातडीने न्याय्य भूमिका न घेतल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी महाराष्ट्रातील बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा करत, सरकारच्या दुर्लक्षामुळे औषध विक्रेत्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाल्याचे म्हटले. मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या या आंदोलनाने राज्यातील औषध व्यवसायातील वाढत्या असंतोषाचे स्पष्ट चित्र समोर आले.




