ताज्या बातम्या

“परंपरेला नवी उभारी देणारा प्रशासक :बिभीषण चवरे

सांस्कृतिक क्षेत्राला समर्पित कार्य करताना प्रशासन आणि कलाजगत यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशाच प्रकारे आपल्या कार्यकाळात ठसा उमटवून आता मूळ विभागात परत रुजू होत असलेले सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांचा कार्यप्रवास विशेष उल्लेखनीय ठरतो. सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी या पदाची धुरा हाती घेतली आणि तब्बल साडेसहा वर्षांच्या कालावधीत संचालनालयाला नवसंजीवनी देत सांस्कृतिक वैभवाची नवी उंची गाठून दिली.
सांस्कृतिक खात्यातील आपल्या कार्यकाळात बिभीषण चवरे यांनी केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, तर सांस्कृतिक चळवळीला नवजीवन देण्याचे काम केले. राज्यभरातील लोककला, पारंपरिक कलाप्रकार आणि उपेक्षित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला. विविध सांस्कृतिक उपक्रम, महोत्सव आणि कलाकार-केंद्रित योजना राबवून त्यांनी विभागाच्या कामकाजात गतिमानता आणली.
त्यांच्या कार्यशैलीत प्रशासनातील शिस्त आणि कलेबद्दलची संवेदनशीलता यांचा सुंदर संगम दिसून येत होता. कलाकारांशी संवाद साधताना त्यांची आपुलकी, तर निर्णय प्रक्रियेत त्यांची ठाम भूमिका—यामुळे ते सर्वांच्या विश्वासास पात्र ठरले. नाटक, तमाशा, लोककला अशा विविध क्षेत्रांतील कलाकारांशी त्यांनी जिव्हाळ्याचा संवाद साधला. प्रत्येक कलाकाराला सन्मानाची वागणूक देणे हा त्यांचा स्वभावधर्मच होता.
कोरोना काळात प्रत्यक्ष कार्यक्रमांना मर्यादा आल्या, तरीही त्यांनी हातावर हात धरून बसण्याऐवजी कलाकारांचा सर्वंकष डेटा संकलित करण्याची मोहीम हाती घेतली. विविध कलाप्रकारांची माहिती एकत्रित करून भविष्यातील धोरणांसाठी भक्कम पाया तयार केला. त्या कठीण काळात आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या लोककलावंतांना अनुदान पॅकेज मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
त्यांच्या कार्यकाळात सांस्कृतिक विभागाच्या उपक्रमांना नवे परिमाण मिळाले. विविध विषयांवरील चित्ररथांची निर्मिती करून राज्याचा सांस्कृतिक ठसा राष्ट्रीय स्तरावर उमटवला. त्यापैकी चार चित्ररथांना पुरस्कार मिळाले, तर गेल्या वर्षीच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला. “महाराष्ट्रातील लोकवाद्ये”, “महाराष्ट्रातील लोककला”, “किंगरीवाला”, “गडगर्जना” यांसारखी पुस्तके प्रकाशित करून त्यांनी सांस्कृतिक वारशाचे दस्तऐवजीकरण केले.
पूर्वी वर्षभरात केवळ २५-३० कार्यक्रम होत असत आणि तेही ठराविक मंडळींपर्यंत मर्यादित राहत. मात्र चवरे यांनी ही परंपरा मोडीत काढत शेकडो कार्यक्रमांची नवी दारे खुली केली. चंद्रपूर, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही वर्षभरात अनेक कार्यक्रम आयोजित होऊ लागले. पडद्याआड गेलेल्या अनेक कलावंतांना त्यांनी पुन्हा प्रकाशझोतात आणले. बहुजन समाजातील थोर कलावंतांवर आधारित कार्यक्रम राबवून त्यांनी सांस्कृतिक समतेचा ध्यास घेतला.त्यांनी लोकवाद्ये आणि दुर्मिळ कला प्रकार यावर पुस्तक लिहिले.दोन तीन पोवाडे लिहिले, विविध ठिकाणावरून दुर्मिळ वाद्ये स्वतःच्या पैशाने खरेदी करून आपला छंद ही जोपासला.
या धकाधकीच्या कार्यशैलीचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. कामाच्या ओढीत स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. अखेरीस गंभीर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर आरोग्याचा विचार करून त्यांनी आपल्या मूळ विभागात परत जाण्याचा निर्णय घेतला आणि संचालक पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती वरिष्ठांकडे केली. त्यानुसार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी त्यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाला अखेरचा निरोप दिला.
त्यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक कलेचे जतन आणि आधुनिकतेशी साधलेला मेळ यामुळे सांस्कृतिक विभाग अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचला. त्यांनी उभारलेला भक्कम पाया आणि दिलेली दिशा येणाऱ्या काळातही मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.
अशा या कर्तृत्ववान अधिकाऱ्याच्या कार्याला शब्दांत मावणे कठीण असले, तरी त्यांच्या कार्यप्रवासाला साजेशी एक ओळ मनात उमटते—
“जपली ज्याने संस्कृती, तोच खरा शिल्पकार,
स्वतः झिजून घडवितो, इतरांचा संसार.”
आता ते आपल्या मूळ विभागात रुजू होत असताना, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली उणीव नक्कीच जाणवेल. मात्र त्यांनी रुजवलेली मूल्ये आणि उभी केलेली परंपरा पुढेही प्रेरणा देत राहील.
त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

— लेखक – खंडूराज गायकवाड

Scroll to Top