मुंबई : देशभरात हेड अँड नेक कॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून त्यातील सुमारे ६२ टक्के प्रकरणे मौखिक कर्करोगाची आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत #Act Against Oral Cancer ही जनजागृती मोहीम वेग घेत असून नागरिकांनी दर महिन्याला केवळ दोन मिनिटे आरशासमोर स्वयं तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सेवांती लिमये (डायरेक्टर – मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल) यांनी “Feel, Look & Act” ही सोपी सवय अंगीकारण्यावर भर दिला आहे. या मोहिमेद्वारे नागरिकांना तोंडातील सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.
हेड अँड नेक कॅन्सरमध्ये तोंड, घसा, नाकाची पोकळी आणि स्वरयंत्र यांचा समावेश होतो. तंबाखू आणि मद्यपान ही प्रमुख कारणे असली तरी एचपीव्ही संसर्ग, तोंडाची अस्वच्छता आणि आनुवंशिकता याही कारणांचा सहभाग वाढताना दिसतो. भारतात सुमारे ८० टक्के रुग्ण तंबाखू सेवनाशी संबंधित आहेत.
सुरुवातीच्या टप्प्यात न भरून येणाऱ्या जखमा, पांढरे किंवा लाल चट्टे, गिळताना त्रास, आवाजात बदल किंवा मानेला सूज अशी लक्षणे दिसतात. प्रगत अवस्थेत वेदना, वजन घटणे आणि रक्तस्राव होऊ शकतो. चिंताजनक बाब म्हणजे सुमारे ६० टक्के रुग्ण उशिरा, तिसऱ्या-चौथ्या टप्प्यात उपचारासाठी येतात.
डॉ. लिमये यांच्या मते, प्रत्येकाने महिन्यातून एकदा आरशासमोर तोंडाची तपासणी करावी. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारी जखम, सैल दात, गाठ किंवा सतत वेदना जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीच निदान, तंबाखू-मद्यापासून दूर राहणे आणि जागरूकता हीच या आजारावरील प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहेत.




