
मुंबई : शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ पासून एकता विनायक चौक, जय महाराष्ट्र नगर बोरीवली (पूर्व), मुंबई येथे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला सुरु होत आहे. ही व्याख्यानमाला रविवार, २६ एप्रिल २०२६ पर्यंत तीन दिवस चालणार आहे. यंदाचे वर्ष हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी थोर समाजसुधारक आदरणीय केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पुनीत स्पर्शाने आपली कारकीर्द घडविणारे जय महाराष्ट्र नगर बोरीवली (पूर्व) चे भाग्यविधाते, ज्येष्ठ पत्रकार श्री. विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला हा ज्ञानयज्ञ सुरु केला. या अखंडपणे सुरु असलेल्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेने आपल्या ४४ व्या वर्षाचा प्रारंभ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आठवणीतले बाळासाहेब’ या विषयावरील व्याख्यानाने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना नेते, खासदार श्री अरविंद सावंत, ज्येष्ठ पत्रकार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय श्री कुमार कदम, दैनिक ‘सामना’ या शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या शिवसेनेच्या मुखपत्रावर लोकमान्य टिळक विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त झालेले ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर हे शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी ‘आठवणीतले बाळासाहेब’ या विषयावर शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी सांगून ‘जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाले’चे पहिले पुष्प गुंफतील. जय महाराष्ट्र नगर बोरीवली (पूर्व) येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार श्री. गोपाळ शेट्टी यांनी पुरस्कृत केलेल्या विजय वैद्य उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराची तसेच जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विजय वैद्य यांच्या नावाचा पहिला उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या दैनिक ‘सामना’ मध्ये प्रारंभापासून सुमारे तीस वर्षे उच्च पदावर निष्ठापूर्वक जबाबदारी पार पाडणारे तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री संजय डहाळे यांना देण्यात येणार आहे. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचा शारदा पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट समीक्षक म्हणून लोकप्रियता मिळविलेले श्री. दिलीप ठाकूर यांना, प्रेरणा पुरस्कार वायंगणकर साई स्पोर्ट्स च्या आधारस्तंभ सौ. पल्लवी राकेश वायंगणकर यांना तसेच जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री विजय पडकील यांना देण्यात येणार आहे. शाल श्रीफळ सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अपरिचित कवितांचे गायन कु. कांचन सावंत या शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी करणार असून याच वेळी लोकप्रिय निवेदिका सौ. दिपाली केळकर या कवितांशी संबंधित निवेदन करणार आहेत. रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी प्रथितयश गायक मंदार आपटे यांचा सुप्रसिद्ध ‘कितीदा नव्याने तुला आठवावे’ या संगीतमय कार्यक्रमातून मराठी आणि हिंदी गीतांचा नजराणा पेश करतील. सुविख्यात नाट्यनिर्माते बाळ कोल्हटकर, गुरुदत्त, राज कपूर, राज खोसला यांचीही यंदा जन्मशताब्दी असून त्यांनाही याद्वारे अभिवादन करण्यात येईल. एकता विनायक चौक, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली (पूर्व), मुंबई येथे रोज सायंकाळी साडेसात वाजता ही व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.*




