ताज्या बातम्या

आरटीओ व वाहतूक व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात पत्रकार परिषद; चालक-मालकांच्या संरक्षणासाठी ठोस उपाय योजना करा – रमेश समुखराव

मुंबई(DDM न्युज) : राज्यातील आरटीओ विभाग, वाहतूक पोलिस व टोल व्यवस्थेमधील कथित भ्रष्टाचार, हप्तेवसुली आणि वाहन चालक-मालकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तीव्र आवाज उठवण्यात आला. रमेश सदाशिव समुखराव (राष्ट्रीय अध्यक्ष व कामगार नेते) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत विविध गंभीर आरोप मांडण्यात आले.
ही पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघ येथील लोकमान्य सभागृहात पार पडली. यावेळी राज्यभरात आरटीओ अधिकाऱ्यांकडून ओव्हरलोडच्या नावाखाली नियमित हप्ते वसुली होत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच वाहन पासिंग, ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण यांसाठीही मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचे सांगण्यात आले.
चेकपोस्टवर कागदपत्र तपासणीच्या नावाखाली चालकांना त्रास दिला जातो, तर ‘एन्ट्री’ न दिल्यास मारहाण किंवा वाहनांची तोडफोड केल्याच्या घटनाही घडत असल्याचा दावा करण्यात आला. काही प्रकरणांमध्ये वाहनांना आग लावल्याचेही सोशल मीडियावर दिसून येत असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. तसेच वाहन उभे असतानाही चुकीचे ऑनलाइन चलन (e-challan) लावले जात असल्याची तक्रार मांडली.
शहरी भागात वाहतूक पोलिसांकडून किरकोळ कारणांवर दंडाच्या नावाखाली वसुली होत असल्याचा आरोप करत, राज्यातील टोल नाक्यांवरही चुकीच्या पद्धतीने वसुली सुरू असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. राज्यातील सर्व टोलनाके बंद करून नवे धोरण तयार करावे, अपघातात मृत्यू झालेल्या चालकांच्या कुटुंबीयांना तात्काळ १० लाखांची मदत व एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, प्रत्येक १०० किमीवर चालकांसाठी विश्रांतीगृहे उभारावीत, तसेच वाहन चालकांसाठी स्वतंत्र अभ्यास आयोग स्थापन करावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
या विषयावर शासनाने तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष रमेश सदाशिव समुखराव यांनी केली.

Scroll to Top