ताज्या बातम्या

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियात मोठी नियुक्ती; प्रवीण व्ही. पाटील यांची मुख्य कार्यकारी अधिकारी व महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) यांनी प्रवीण व्ही. पाटील यांची महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली असून ही नियुक्ती १ एप्रिल २०२६ पासून लागू झाली आहे.

प्रवीण पाटील हे उद्योग, शासन, शिक्षण, सल्लागार व उद्योजकता क्षेत्रात तीन दशकांहून अधिक अनुभव असलेले कुशल धोरणात्मक नेतृत्व मानले जातात. ते पुणे येथील एलिव्हेंटेज कौन्सल्टिंग ग्रुप ( ElevateEdge Consulting Group) या धोरणात्मक व्यवसाय वृद्धी सल्लागार संस्थेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
यापूर्वी त्यांनी MIT World Peace University येथे मुख्य कार्यकारी अधिकारी व वरिष्ठ संचालक (२०१९-२०२३), Starkenn Bikes चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (२०१३-२०१९), तसेच Hero Cycles मध्ये अध्यक्ष (व्यवसाय प्रमुख) (२०१२-२०१३) अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
तसेच भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विशेषतः Ministry of Youth Affairs and Sports (युवा व क्रीडा मंत्रालय) मध्ये त्यांनी विशेष कर्तव्य अधिकारी व केंद्रीय मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय Tata Group, Reliance Industries, Aditya Birla Group आणि Citibank यांसारख्या मोठ्या उद्योगसमूहांमध्ये त्यांनी वरिष्ठ नेतृत्व भूमिका निभावल्या आहेत.
प्रवीण पाटील यांनी भारतातील सायकलिंग क्षेत्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी सीएफआय व Cycling Association of Maharashtra यांच्या सहकार्याने पुण्यात सलग पाच वर्षे माउंटन बाईक राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केली. तसेच पनवेल येथे रस्ते सायकलिंग स्पर्धा, विविध राज्यस्तरीय स्पर्धा आणि मुंबईत हजारो सहभागी असलेले सायकलिंग उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
सायकलिंगला पर्यावरणपूरक व आरोग्यदायी वाहतुकीचा पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी Petroleum Conservation Research Association (पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना) आणि इतर संस्थांसोबत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. प्रीमियम सायकल क्षेत्राचे भारतातील जनक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली Starkenn Bikes कंपनीने उच्च श्रेणीतील सायकल क्षेत्रात अव्वल स्थान मिळवले.
सीएफआयचे सरचिटणीस Maninder Pal Singh यांनी सांगितले की, “प्रवीण पाटील यांचा अनुभव, नेतृत्वगुण आणि सायकलिंगबद्दलची बांधिलकी पाहता ते संस्थेसाठी योग्य नेतृत्व ठरतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रायोजकत्व, भागीदारी आणि महसूल निर्मिती यांना चालना मिळेल. तसेच प्रशासनात अधिक पारदर्शकता व कार्यक्षमता येईल.”
प्रवीण पाटील यांच्या नियुक्तीमुळे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या कामकाजात अधिक व्यावसायिकता येऊन देशभर सायकलिंग क्रीडाप्रकाराचा विस्तार करण्यास गती मिळणार आहे. त्यांच्या सोबत कमांडंट अजीत सिंग (तांत्रिक संचालक), डॉ. धर्मेंद्र लांबा (उच्च कामगिरी संचालक), व्ही.एन. सिंग (प्रशासन संचालक) आणि विनय कुमार (आंतरराष्ट्रीय संबंध व्यवस्थापक) यांसारखे अधिकारी कार्यरत असतील.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) बद्दल :
सीएफआय ही भारतातील सायकलिंग क्रीडाप्रकाराची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था असून ती भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाने मान्यताप्राप्त आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंग संघटना) शी संलग्न आहे.
Scroll to Top