ताज्या बातम्या

अन्न गोदाम महामंडळ मार्गावर वासनतळासाठी सम / विषम फलक ; राजेंद्र नगर बोरीवली येथे पार पडला कार्यक्रम

मुंबई : राजेंद्र नगर, बोरिवली (पूर्व) येथील भारतीय खाद्य निगम रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली वाहनांची संख्या, अन्न गोदाम महामंडळातून रोज ये करणाऱ्या सुमारे दोनशे ते अडीचशे मालवाहू मोटारी, यामुळे दररोज स्थानिक नागरिकांना सकाळी व संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता.
अनेक वेळा या संदर्भात स्थानिक नागरिक तसेच विविध संघटनेमार्फत आमदार संजय उपाध्याय व नगरसेविका ॲड सीमा शिंदे यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या मार्गावर होत असलेल्या दुतर्फा पार्किंग मुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिक, ऑटो रिक्षा, शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या –येणाऱ्या शाळेच्या बसेस, येथील व्यापारी वर्ग, सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णवाहिका देखील अडकण्याचे प्रकार बहुतांश रोजच्या रोज घडत आहेत.
त्या अनुषंगाने नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आमदार संजय उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका ॲड्. सीमा शिंदे यांच्या सहकार्याने सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे बोरीवली विधानसभा उपाध्यक्ष सुधीर परांजपे यांनी पुढाकार घेऊन सातत्याने मुंबई महानगरपालिका व दहिसर वाहतूक विभाग यांच्या सोबत पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. अखेर मुंबई महानगरपालिकेच्या व दहिसर वाहतूक पोलीस यांच्या सहकार्याने या मार्गावरील वाहतुकीचा भार लक्षात घेता ‘एक दिवस उजवीकडे / एक दिवस डावीकडे’ अशा स्वरूपाच्या वाहनतळ (पार्किंग) व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच अवजड वाहनांना येथे कायम स्वरुपी नो पार्किंग व या आदेशांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कायदेशीर कारवाई वाहतूक विभागाकडून करण्यात यश आले. या सम/ विषम पार्किंग फलकाचे अनावरण करण्यात आले. या उपाययोजना करण्यात आल्या मुळे परिसरातील वाहतूक सुरळीत व शिस्तबद्ध राहील असा विश्वास यावेळी बोलताना नगरसेविका ॲड्. सीमा शिंदे यांनी व्यक्त केला.
आता नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या त्रासापासून दिलासा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या प्रसंगी नगरसेविका ॲड. सीमा शिंदे, सुधीर परांजपे, धर्मवीर ठाकूर, स्मिता मोरजकर, जिगर भाटिया विनीत उदेशी, डेव्हिड गणेश, योगेश चंपाणेकर, लोकेश दासारी, दीपश्री चव्हाण, महेशकुमार राजपुरोहित व इतर कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top