ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

नवी मुंबईत प्रथमच शिवराज्याभिषेक सोहळा; विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मान्यवरांचा गौरव

नवी मुंबई :

शिवतुतारी प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमच नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या भव्य कार्यक्रमास नवी मुंबईतील विविध सामाजिक व सांस्कृतिक मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या सोहळ्यात दहावी व बारावी परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पाणीपतकार व इतिहास संशोधक विश्वास पाटील होते. त्यांच्यासोबत पद्मश्री अच्युत पालव, उद्योजक प्रकाश बाविस्कर, कला क्षेत्रातील अशोक हांडे आणि क्रीडा क्षेत्रात अर्जुन पुरस्कार प्राप्त नवी मुंबईच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे यांचा सन्मानही करण्यात आला.

अभिलाषा म्हात्रे म्हणाल्या, “माझा प्रवासच माझा खरा पुरस्कार आहे. एशियन गेम्समधील अंतिम सामन्याचा तो क्षण, जेव्हा संपूर्ण स्टेडियम माझं नाव घेत होतं, तोच माझ्या आयुष्यातील सर्वोच्च गौरव आहे. मेहनतीवर विश्वास ठेवल्यास यश अटळ आहे.”

प्रकाश बाविस्कर यांनी सांगितले, “1991 मध्ये महानगरपालिकेच्या स्थापनेपासून मी सहभागी आहे. पहिल्या टेबलपासून सुरूवात करून हजारो कुटुंबांना घरे देण्यापर्यंतचा प्रवास अनुभवला.”

अशोक हांडे यांनी नमूद केले, “माझ्या पहिल्या कवितेपासून ते पद्मश्री अच्युत पालव यांच्या गौरवापर्यंत सगळ्याचा स्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा.”

पद्मश्री अच्युत पालव म्हणाले, “मराठी भाषा लिहायला जितकी सोपी वाटते, तितकीच ती खोल आहे. त्याच भाषेच्या साधनेतून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे जीवनभराच्या संघर्षाचे चीज आहे.”

शेवटी प्रमुख पाहुणे विश्वास पाटील यांनी महाराजांच्या जीवनातील थरारक प्रसंग, फितुरांवर त्यांनी केलेला खर्च, आणि शिवराज्यभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व याविषयी थेट इतिहासाच्या दाखल्यांसह प्रभावी शैलीत मांडणी केली. “शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते तर दूरदृष्टी असलेले राजकारणी होते, ज्यांनी आपला प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शिवतुतारी प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा. रवींद्र पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उत्तम नियोजन आणि कार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. नवी मुंबईत शिवप्रेमाने भारलेला आणि विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी गौरवाने सजलेला हा सोहळा लक्षात राहिला. यावेळी शाहीर रुपचंद चव्हाण यांचा शाहिरी बाणा हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

Scroll to Top