प्रतिनिधी : ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचा भयंकर अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या बसमध्ये विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी शाळेची बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत.
हरियाणातील महेंद्रगड येथे भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. स्कूल बसचं नियंत्रण सुटल्याने ती उलटली ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली.बसमध्ये सुमारे 35 ते 40 विद्यार्थी होते. अपघातानंतर 6 मुलांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं. मात्र त्यांना मृत घोषित केले आहे.
महेंद्रगड जिल्ह्यातील ही स्कूलबस असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये 15 विद्यार्थी जखमी असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. बस चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असा स्थानिकांचा दावा आहे. स्थानिक लोकांच्या आरोपानंतर पोलीस बस चालक दारूच्या नशेत होता का याचाही तपास करत आहे.