नवी दिल्ली : दिल्लीतील पश्चिम विहार भागात पोलिसांनी एका घराचा दरवाजा ठोठावला, तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी तत्काळ त्या घरातून 2 महिलांसह 45 जणांना अटक केली. पोलिसांची ही कारवाई पाहून संपूर्ण परिसरातील लोक हादरले, एवढ्या रात्री पोलिसांनी एवढ्या लोकांना एकत्र का पकडलं? असं नेमकं काय झालं? असा सवाल सर्वजण करत आहेत.
खरं तर हे घर संध्याकाळ झाली की लाईटने उजळून जात असायचं. जसजसा अंधार पडायचा तसतशी घरात लोकांची गर्दी वाढत जायची आणि मोठमोठ्याने आवाज येऊ लागायचे. अशा स्थितीत आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना कळवलं, त्यानंतर रात्री उशिरा पोलिसही त्या घरात पोहोचले. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना आतमध्ये चक्क जुगार सुरू असल्याचं दिसलं. त्यानंतर पोलिसांनी या टोळीतील 2 महिलांसह एकूण 45 जणांना अटक केली.
पोलीस उपायुक्त जिमी चिराम यांनी सांगितलं की, स्थानिक पोलिसांना शुक्रवारी रात्री मुलतान नगरमधील एका घरात जुगार खेळणाऱ्या टोळीची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कारवाई केली. चिराम म्हणाले, ‘निरीक्षक पवन कुमार आणि उपनिरीक्षक चंदन पासवान यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली होती, ज्यांनी घरावर छापा टाकला आणि दोन महिलांसह 45 जणांना अटक केली.’
पोलिसांनी सांगितलं की, छाप्यामध्ये 9,53,495 रुपये रोख, कार्डांची 18 पाकिटे, 16 फासे, हार्ड प्लास्टिकचे 25 आयताकृती टोकन आणि 96 राउंड टोकन जप्त करण्यात आले आहेत. दिल्ली सार्वजनिक जुगार कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 186 अंतर्गत आरोपींविरुद्ध पश्चिम विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींची अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एका घरात २ महिला ४५ पुरुष रात्री हे करायचे काम ? पोलिसांची कारवाई
RELATED ARTICLES