Tuesday, April 29, 2025
घरमनोरंजनलक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती मुक्ता बर्वे, अवघ्या चार वर्षांची असताना झळकली...

लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती मुक्ता बर्वे, अवघ्या चार वर्षांची असताना झळकली होती ‘या’ लोकप्रिय चित्रपटात

प्रतिनिधी : बहुआयामी व अभ्यासू अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ताच्या सहसुंदर व नैसर्गिक अभिनयाचा एक वेगळा आणि मोठा चाहता वर्ग आहे. वैविध्यपूर्ण, आव्हानात्मक भूमिका साकारून मुक्ताने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशी महाराष्ट्राची लाडकी मुक्ता अवघ्या चार वर्षांची असताना एका लोकप्रिय चित्रपटात झळकली होती. एवढंच नाहीतर ती या चित्रपटात प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती.

अभिनेत्री मुक्ता बर्वे नुकतीच ‘राजश्री मराठी’च्या ‘तिची गोष्ट’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी मुक्ताने तो किस्सा सांगितला. अभिनेत्री म्हणाली, “माझा भाऊ उत्तम अभिनेता आहे. त्याने ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ या चित्रपटात बालकलाकारचं काम केलं होतं. तेव्हा लहान मुलांचं शूटिंग मे महिन्यात असायचं. तर आई मला तिच्याबरोबर दादाच्या शूटिंगला घेऊन गेली होती. मी अवघ्या चार वर्षांची होते; पहिलीत जाणार होते. त्या चित्रपटाच्या गाण्याचं शूटिंग सुरू होतं आणि आई मला एका ठिकाणी घेऊन उभी होती. लक्ष्मीकांत बेर्डे सर, नितीश भारद्वाज, वर्षा उसगावकर, दया डोंगरे, स्मिता तळवलकर, दादा, मोहन जोशी सर असे सगळे गाण्याच्या सिक्वेंसमध्ये होते. आई बाजूला बसली होती, मी शूटिंग बघत उभी होते. जसं गाणं सुरू झालं तसं मी उभं राहून नाचू लागले. तर तेव्हा शॉर्ट कट झाला. कारण मी नाचत नाचत शूटिंग सुरू असलेल्या ठिकाणी गेले होते.”

“आई घाबरली की, आपल्यामुळे थांबलं. कारण आपल्याला काही माहिती नसतं, हे क्षेत्र नवीन होतं. दादासाठी आम्ही तिथे गेलो होतो. अण्णासाहेब देऊळगांवकर नावाचे खूप मोठे दिग्दर्शक. पूर्वीच्या मराठी सिनेमात त्यांनी भयंकर काम केलंय. ते म्हणाले, कट…कट. ती छोटी मुलगी निनादची बहीण आहे ना? मास्टर निनाद असं दादाचं सिनेमातलं नाव होतं. त्याला देबू म्हणतात. तर आई म्हणाली, “हो. सॉरी, सॉरी. अण्णासाहेब सॉरी.” मग ते म्हणाले, “नाही नाही. ती खूप चांगली नाचतेय. तिच्याकडे काही कपडे आहेत का?” आई म्हणाली, “हो हॉटेलवर आहेत.” ते म्हणाले, “जा कपडे घेऊन या.” मग आई आणि स्मिताताई तळवलकर युनिटची गाडी घेऊन हॉटेलवर गेल्या. कोल्हापूरमध्ये शूटिंग सुरू होतं. चित्रपटात जे कपडे घातलेत. ते दादाच्या मुंजीतले कपडे आहेत. झब्बा, कुर्ता आणि जॅकेट हे दादाचे कपडे मला घालून आणलं. त्या गाण्यात मी आहे आणि पहिल्यांदा मी सिनेमात नाचलीये,” असं मुक्ता म्हणाली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments