प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी प्रचार सभांचं आयोजन केले असून सगळीकडे प्रचाराचा जोर दिसून येत आहे. विविध पक्षांच्या स्टार प्रचारकांनी आपापल्या पक्षाच्या प्रचाराची कमान सांभाळलेली दिसून येत आहे. दरम्यान, इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याविषयी राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शुक्रवारी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून जनतेला २५ गॅरेंटी म्हणजे आश्वासने दिली आहेत. लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यास ही सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही काँग्रेसने दिली आहे.
या जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीनंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना राहुल गांधी यांनी उत्तरं दिली. ते म्हणाले की, इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आपापल्या विचारधारेसह ही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे निवडणुकीचे निकाल पाहूनच पंतप्रधान पदाच्या उमेदवाराविषयी निर्णय घेतला जाईल. हा निर्णय इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये घेतला गेला आहे. तसेच, आज हिंदुस्थान एक वैचारिक निवडणूक लढवत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा निवडणुकीनंतर घेतला जाणार आहे, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.