प्रतिनिधी : ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015’ विषयी सविस्तर माहिती मिळावी तसेच लोकसेवा नागरिकांना सुलभ व सहज रितीने उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका राबवित असलेल्या कार्यप्रणालीबाबत जनजागृती व्हावी यादृष्टीने सेवा हक्क दिनाचे औचित्य साधून 28 एप्रिल रोजी महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना आवश्यक असणा-या लोकसेवा सुलभ रितीने उपलब्ध व्हाव्यात याकरिता ऑनलाईन प्रणालीचा प्रभावी वापर केला जात आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळाप्रमाणेच माझी नवी मुंबई – My NMMC या ॲपवरही या लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. यामध्ये जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी अशा विविध 68 लोकसेवा ऑनलाईन पुरविण्यात येत आहेत.
या लोकसेवांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता यावी यादृष्टीने मनोरंजनातून प्रबोधन करणार-या पथनाट्यासारख्या लोकप्रिय व प्रभावी माध्यमाचा समर्पक वापर महापालिकेच्या वतीने करण्यात आला.
क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने लोकसेवांबाबत माहितीप्रद विशेष पथनाट्याचे सादरीकरण महापालिका क्षेत्रात मुख्यालयाप्रमाणेच मॉल, स्टेशन परिसरात करण्यात आले. आरंभ इव्हेन्ट्सतच्या अक्षय खांबे, शौनका पोळ, धीरज सोडिये, आशिष कदम, प्रतीक घाडगे, शुभम भोबस्कर या कलावंतांनी सादर केलेल्या पथनाट्याला सर्व ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.