मुंबई: प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकसंवाद वाढवावा. लोकसंवादातून नागरिकांच्या प्रतिक्रियांची नोंद घ्यावी, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लोकसंवाद खूप आवश्यक आहे. तसेच विभागप्रमुखांनी आपापसात समन्वय ठेवावा असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केले आहे.
मुंबई महापालिकेची मुदत संपल्यामुळे महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकांची राजवट सुरू आहे. नागरिक आणि प्रशासनातील दुवा असलेले नगरसेवक सध्या नसल्यामुळे अधिकारी आणि नागरिकांमधील संवाद संपला आहे. मात्र हाच संवाद वाढवावा असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारच्या आढावा बैठकीत दिले. गगराणी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, नागरी सेवा-सुविधांशी संबंधित प्रश्न हे प्रशासकीय कार्यवाहीप्रमाणेच समाजाशी, नागरिकांशी संबंधित असतात. जटील प्रश्नांची प्रशासकीय उत्तरे शोधता येतात. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकसंवाद वाढवणे फार गरजेचे आहे. कारण, लोकसंवाद हे नागरिकांच्या प्रतिक्रियांची नोंद घेणे, त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे योग्य निराकरण करणे आदींसाठी महत्वपूर्ण आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विभागांनी आपापसांत उत्तम समन्वय ठेवावा, असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले.
