प्रतिनिधी : लोकसभेची ही लढाई देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. लोकशाही व देशाचे संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. भारतीय जनता पक्ष महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देऊन वेगळा अजेंडा जनतेसमोर मांडत आहे, परंतु त्यांच्या अजेंड्याला बळी पडू नका. खोटं बोला, पण रेटून बोल, ही भाजपाची निती आहे. आपण मात्र सत्य मांडू व भाजपाला जाब विचारू. लोकसभा निवडणुकीची ही लढाई हिटलशाही, दहशतशाही आणि व मनुवादाविरोधातील लढाई असून एक होऊन त्याविरोधात लढण्याची गरज असल्याचे आवाहन मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. दक्षिण मध्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वर्षा गायकवाड बोलत होत्या.
भाजपाने 10 वर्षात सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभागाच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे. या कारवाईला घाबरून काहीजण भाजपात गेले. कालपर्यंत या सरकारी यंत्रणा ज्यांना नोटीस पाठवायच्या ते भाजपात गेले की वॉशिंग मशीनमधून स्वच्छ झालेत. याशिवाय काही लोकांचे क्लोजर रिपोर्टही येत आहेत. भाजपा सरकारच्या हुकूमशाहीला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. 10 वर्षात भाजपा सरकारने काय केले? भाजपाच्या नेत्यांना व उमेदवारांना जाब विचारला पाहिजे.
प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख जमा करण्याचे काय झाले? महागाई कमी का केली नाही? महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर का बोलत नाही? असे प्रश्न विचारले पाहिजेत. भाजपाच्या उमेदवारांना काही भागात जनता प्रवेश देत नाही. लोक भाजपाच्या खोटेपणाला कंटाळले आहेत. ‘अब की बार 400 पार’ हा भाजपाचा प्रपोगेंडा आहे. दक्षिणेत साफ, उत्तरेत अर्धा आहे, त्यामुळे 400 पार कसं होणार? असा प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्ष 180 जागांच्या वर जाऊ शकत नाही, असा दावा वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
दक्षिण मध्य मतदारसंघातील खासदराने लोकसभेत स्थानिक प्रश्न मांडले नाहीत. रेल्वेचे प्रश्न मांडले नाहीत, धारावीतील ७ लाख लोकांना बेघर केले जात आहे, पण त्यावर खासदार संसदेत बोलले नाहीत, असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी ज्यांना मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष केले, दोनदा खासदार केले ते उद्धव ठाकरेंचे झाले नाहीत तर जनतेचे काय होणार? ५० खोके आणि अदानीचे डोके, असा टोला लगावला. तसेच दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील उमेदवार अनिल देसाई यांना धारावीतून सर्वात जास्त मताधिक्य देऊ, इतर जिल्ह्यातूनही बहुमत देऊन विजयी करू, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिवसेना व इंडिया आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला राज्यसभा खासदार चंद्राकात हंडोरे, माजी मंत्री दिवाकर रावते, आमदार भाई जगताप, माजी खासदार हुसेन दलवाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव, आम आदमी पक्षाच्या प्रिती मेनन, श्रद्धा जाधव, आमदार फातर्फेकर आदी उपस्थित होते.