मुंबई महापालिकेच्या महत्तपूर्ण प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या ‘सब वे’त पावसाळ्याआधीच पाणी शिरले. पावसाला अद्याप दोन महिने शिल्लक आहेत. मात्र त्याआधीच कोस्टल रोडचा सब वे पाण्यात गेला. गुरुवारी दुपारच्या सुमारास हाजी अलीकडे जाणाऱ्या सब वेमध्ये भरतीचे पाणी शिरले. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
प्रतिनिधी : कोस्टल रोड प्रकल्पामध्ये नागरिकांना मुख्य भूभागापासून समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी सुमारे २० भुयारी मार्ग बांधले आहेत. हे ‘सब वे’ समुद्री सपाटीपासून सुमारे ४.९ मीटर उंच असल्याचा दावा कोस्टल रोड प्रशासनाने केला आहे. कोस्टल रोडच्या बांधकामासाठी १३ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. कोस्टल रोडवरील वरळी ते मरीन ड्राइव्ह असा एक मार्ग ११ मार्चपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र महिनाभरातच या मार्गावर भेगा पडल्या. त्यामुळे कोस्टल रोडच्या बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. अशातच गुरुवारी हाजीअली दर्गाकडे जाणाऱ्या सब वेमध्ये भरतीचे पाणी शिरले. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, याबाबत कोस्टल रोड प्रवाशसनाने सांगितले की, या ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांचे काम सुरू असून पावसाळ्याआधी काम पूर्ण होईल. सब वेमध्ये येणारे अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी टाकी बांधण्यात येईल आणि ते समुद्रात सोडून हा प्रश्न सोडवला जाईल. तसेच रस्त्यावरील भेगा किरकोळ असून ‘इपॉक्सी’ तंत्रज्ञानाने बुजवण्यात येणार आहेत.