सातारा : कोयना जलविद्युत प्रकल्पात आपले सर्वस्व अर्पण करून अनेक गावे विस्थापित झाली. मात्र आज तब्बल ६४ वर्षानंतरही धरणग्रस्तांच्या समस्या जैसे थे आहेत. परिणामी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या वतीने राज्यभरातील सर्व तहसील कार्यालयात एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी जावळी,महाबळेश्वर, कोरेगाव व पाटण तहसील कार्यालयाच्या आवारात देखील संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी विविध मागण्यांबाबत तहसीलदार हनमंत कोळेकर व तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी १९५८ मध्ये सातारा जिल्ह्यातील विविध गावांची जमीन संपादित करण्यात आली. त्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेल्याने कोयना प्रकल्पग्रस्तांचे रायगड, ठाणे, पालघर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले. सर्व विस्थापित कुटुंबांना पर्यायी शेतजमीन, नागरी सुविधा व इतर सवलती पुरवण्याची शासनाची नैतिक जबाबदारी होती; मात्र कोयना प्रकल्पग्रस्त आजही हलाखीचे जीवन जगत आहेत. पुनर्वसन झाल्यापासून त्यांची तिसरी पिढी निर्माण झाली तरी त्यांना शिक्षण, स्थैर्य व विकासापासून वंचित ठेवले आहे. प्रशासन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत अनभिज्ञ आहे.
यावेळी कोयना प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात खातेदारांना व पोट खातेदारांना पर्यायी जमिनींचे वाटप करावे, प्रकल्पग्रस्त वसाहतींना १८ नागरी सुविधा देण्यात याव्यात. विस्थापितांना शेतजमिनी व घरप्लॉट देण्यात यावेत, शिल्लक राहिलेल्या जमिनींचे वाटप करावे, प्रकल्पग्रस्त दाखले मिळावे, व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित वसाहतींना नागरी सुविधा मिळाव्या, व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रातील वेळ-ढेन धनगरवाडा या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा,गावठाणांना महसुली दर्जा मिळावा, स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, गावठाण मोजणी नकाशे तयार करावे व सातबारे वितरित करावेत, वाटप जमिनीचे सीमांकन करावे आदी प्रलंबित मागण्यांकरिता अखिल कोयना संघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा देखील प्रकल्पग्रस्तांच्या वतीने देण्यात आला.
यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष राम पवार, राज्य उपाध्यक्ष आनंद सकपाळ, जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र कोकरे पाटील, सातारा तालुकाध्यक्ष बबन सागवेकर,जिल्हाचिटणीस राजेंद्र सावंत,ज्ञानदेव गोरे,निलेश भोसले,संतोष पवार,गणेश मुसळे,अंकुश सावंत,धोंडीबा सावंत,बाबुराव जाधव,सुनंदा सकपाळ,रामचंद्र खरात,राजाराम पवार,अवधूत सावंत आदी प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट:
आझाद मैदान येथे धरणे आंदोलन..
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या वतीने २ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान कोकण भवन ते विधानभवन असा लॉंग मार्च व आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कोयना प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाला दिला.