
प्रतिनिधी : गुढीपाडव्याच्या सणासाठी श्रीखंड त्याच दिवशी आणा आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्येला नको. कारण तो दिवस छत्रपती शंभूराजे यांची पुण्यतिथी असून तमाम हिंदूंनी हा दिवस बलिदान दिवस म्हणून पाळला पाहिजे, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त श्री राजेश उर्फ राजू देसाई यांनी कळकळीचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या शिवराजाभिषेक दिनानिमित्त जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळाच्या प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयात शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त श्री राजेश शांताराम उर्फ राजू देसाई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाभिषेकसह अनेक घटना खड्या आवाजात कथन केल्या तसेच औरंगजेबाने छत्रपती शंभूराजे यांचा तब्बल चाळीस दिवस अतोनात छळ केला. शंभूराजे यांचे हात तोडण्यात आले. डोळे काढण्यात आले, शीर धडापासून वेगळे केले पण छत्रपती शंभूराजांची ना नजर झुकली, ना मान झुकली. हमने हमारी फौजमें कैसे कैसे सूरमा पालके रखे हैं, शाहिस्तेखान गया तो शिवाने उसकी उंगलियाॅं काटके भेज दिया, अफझलखान को शिवाने वहीं दफना दिया. हमको दुष्मन भी मिला तो शिवा जैसा और शंभू जैसा. अगले जनम में हमें शंभू जैसा शूरवीर बेटा मिले, असे औरंगजेबाने म्हटले असल्याचे खफीखान या औरंगजेबाच्या इतिहासकाराने लिहून ठेवले आहे, असे जेंव्हा राजू देसाई यांनी सांगितले तेंव्हा उपस्थित शिवभक्तांच्या अंगावर काटा उभा राहिला. साहित्यिक विजय मडव, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, मनोहर देसाई, वसंत सावंत, दिनेश विचारे, अभिलाष कोंडविलकर, दिलीप चव्हाण, संजना वारंग, सुभाष देसाई, हेमंत पाटकर, कांचन सार्दळ, रोहिणी चौगुले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.