मुंबई : शिवराजाभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे झाल्यानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सहकार्याने सईशा प्रोडक्शन मुंबई निर्मित शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालन,संगीत शिवस्वराज्यगाथा, शिवकाळाचा वेध घेण्यासाठी झपाटलेले संग्राहक श्री रंजन गावडे यांनी शिवकालीन दुर्मिळ नाणी (शिवराई), भारतीय आणि परदेशी नोटा व नाणी आणि वस्तू तसेच त्यांनी काढलेल्या गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे गाथा शिवशौर्याची हे प्रदर्शन आयोजित केले होते. यावेळी सागर पाटणकर यांनी सजविलेल्या शिवरायांची प्रतिमा असलेल्या दोन रुपयांच्या २२,२२२ नाण्यांनी साकारलेली शिवप्रतिमा हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते. मुंबई,कोलकाता,नोयडा आणि हैद्राबाद मिंट येथील नोटांचा यात समावेश होता.
या तिन्ही कार्यक्रमांस रसिकप्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. शिवकालीन दुर्मिळ नाणी (शिवराई) प्रदर्शन, शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालनाला विशेष करून तरुण पिढीचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने शिवचरित्र, शिवचरित्रातून व्यक्तिमत्व विकास, राष्ट्रीय चारित्र्य, शिचरित्रातून राष्ट्र विकास होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन अशा विषयांवर प्रबोधनपर मार्गदर्शनही करण्यात आले होते. अनिल नलावडे यांनी लिहिलेल्या शिवचरित्रावरील विविध पैलूंवर काव्यमय पंक्ती याबद्दल सर्वानाच विशेष पसंती दाखवली. अनिल नलावडे यांच्या लेखणीतून उतरलेले काव्य सादर करण्यासाठी गायक श्रीरंग भावे, नचिकेत देसाई, अनिल नलावडे आणि दीप्ती आंबेकर यांच्या सुरेल आवाजातून संगीत शिवस्वराज्यगाथा हा संगीतमय सोहळा सादर करण्यात आला. या दोन्ही कार्यक्रमांचे संयोजन, निवेदन, सूत्रसंचालन आणि दिग्दर्शन पद्मश्री राव यांनी केले. शिवराज्याभिषेकावरील सादर केलेल्या गाण्याला भरगच्च गर्दीने टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून मानवंदना दिली. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आप्पा परब, माई परब, ज्येष्ठ संगीतकार सोमनाथ परब आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.
