प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे महिला सक्षमिकरणाचे दावे खोटे आहेत. मातृशक्तीही मोदी का रक्षाकवच, नारी वंदन ह्या पोकळ घोषणा आहेत. कर्नाटकात जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाचे लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागितली, रेव्वनाला मत म्हणजे मोदींना मत असे त्यांनी जाहीरपणे सांगितले पण ह्याच प्रज्वल रेवन्नाने शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केले व देश सोडून पळून गेला. बलात्कारी रेवन्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मते मागून त्यांची मातृशक्ती वंदना केवळ देखावा आहे दाखवून दिले आहे, अशी घणाघाती टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मातृदिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात बोलताना वर्षा गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार प्रहार केला, भाजपा सरकारच्या १० वर्षाच्या राजवटीत महिला अत्याचार वाढले आहेत, हाथरस, उन्नाव येथील मुलींवरील अत्याचार असो वा महिला खेळाडूंवर भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी केलेले अत्याचार असो, भाजपाने त्यांच्यावर कारवाई केली नाही. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर चकार शब्द काढला नाही. प्रज्वल रेवन्नाचे कारनामे भाजपाला माहित होते तरिही त्यांच्या पक्षाशी भाजपाने युती केली. शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यासाठी मते मागून नरेंद्र मोदी यांनी महिलांचा अपमान केला आहे. मुंबईत महिला सुरक्षित नाहीत, लोकलमधून रात्री प्रवास करणे महिलांसाठी धोकादायक झाले आहे. मुंबई व महाराष्ट्रातून हजारो मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत पण भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही.
काँग्रेस पक्षाने न्याय पत्रात महिला न्याय अंतर्गत, प्रत्येक गरिब कुटुंबातील एका महिलेला वर्षाला १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे, अंगणवाडी सेविका व आशा सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ केली जाणार आहे, तसेच सरकारी नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा, वर्षा गायकवाड यांनी आजही प्रचाराचा धडका कायम ठेवला. सांताक्रूज पूर्व भागातील नारळवाडी शाळेसमोर जाहीर सभा घेण्यात आली, कुर्ला पूर्व भागात व कलिना विधानसभा मतदार संघातील वाकोला मशिद ते ईश्वरनगर दरम्यान जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली. मातृदिनानिमित्त कुर्ला पूर्व भागातील कुरेशी नगरमध्ये महिला मेळावा घेण्यात आला. कुर्ला विधानसभा मतदारसंघातील विणा पुरव मार्ग, नेहरु नगर व टिळक नगर येथे जाहीर सभा घेण्यात आल्या.
