प्रतिनिधी(रमेश औताडे) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगूनही बेस्ट कंत्राटदार ऐकत नसल्याने आम्ही पुन्हा आझाद मैदानात आंदोलन करणार आहे. त्यामुळे बस सेवा ठप्प झाली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही असा इशारा बेस्ट कंत्राटी बस चालकांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
बेस्ट परिवहन सेवेत कंत्राटी बस जास्त असून बेस्ट च्या बसेस कमी आहेत.आमचे कंत्राटी वाहकांचे कामाचे तास व कामाची गुणवत्ता ही बेस्ट परिवहनच्या कायम कामगाराप्रमाणेच असताना वेतनात फरक का ? आम्ही जिवंत वाहक आहोत की अदृश्य वाहक आहोत. १७ हजारात घर चालते का ? आमचे कुटुंब या मुंबईत एवढ्या वेतनात राहू शकत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया रघुनाथ यांनी यावेळी दिली.
सहा कंत्राटदार बेस्ट परिवहन सेवेत बस सह आम्हा चालकांची सेवा जनतेला देत आहेत. हे सहा कंत्राटदार गब्बर होत असताना आम्ही आत्महत्या करण्याच्या वाटेवर आलो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी लक्ष घालूनही कंत्राटदार जर ऐकत नसतील तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असे रघुनाथ यांनी सांगितले.
सुट्ट्या नाहीत, कामाची गॅरंटी नाही, मेडिकल सुविधा नाही, रजेचा पगार नाही, महागाई वाढली असताना १७ हजार वेतन मिळते हे जगाच्या. पाठीवरील वाहन चालकांचे एकमेव उदाहरण असेल असे रघुनाथ यांनी सांगितले.
