प्रतिनिधी(रमेश औताडे) : शरद पवार यांनी सत्तेचा , विरोधकांमधील मैत्रीचा व प्रसार माध्यमांचा चाणाक्षपणे वापर करून स्वतःची काळीकुट्ट दुसरी बाजू लपवलेली आहे. ती जनमानसासमोर आणण्याचा प्रयत्न मी केला आहे. मागील वीस पेक्षा अधिक वर्षे मी राष्ट्रवादी पक्षात होतो . हजारो तरुणांनी उध्वस्त होऊन शरद पवार व त्यांच्या पक्षाची निस्वार्थ सेवा केली आहे. २०२० च्या कोविड लॉक डाऊन पासून पक्ष नेतृत्व, पक्षाचे नेते, मोठे पदाधिकारी यांच्या सार्वजनिक कार्याची चिकिस्ता मी सुरू केली व त्या चिकिस्तेचा परिणाम म्हणजे शरद पवारांची दुसरी काळीकुट्ट बाजू मांडणारे ” दगाबाज ” हे पुस्तक आहे. असे या पुस्तकाचे लेखक एम बी पाटील यांनी पुस्तक प्रकाशन वेळी सांगितले.
शरद पवारांच्या सहा दशकांच्या राजकीय व सार्वजनिक जीवनावर व जनसामान्य नागरिकांना माहिती नाही अशी दुसरी काळीकुट्ट वास्तववादी बाजू या पुस्तकात असून , जनसामान्य माणूस, मतदार, तरुण वर्ग, शेतकरी, कष्टकरी वर्गाला शरद पवारांनी कसे फसवले ? राजकारण व देशाच्या विकासासाठी पवारांचे नेमकं योगदान काय ? त्यांनी नेमके काय करायला पाहिजे होते ? याची कारणमीमांसा या पुस्तकाच्या माध्यमातून केली आहे. पवार व इतर पुढारी यांना विरोधाला विरोध म्हणून या पुस्तकाच्या निर्मिती मागील उद्देश्य नाही असे पाटील म्हणाले.
लोककल्याणकारी राज्याची संकल्पना व प्रत्यक्ष अंमलबजावणी बाबत पवारांची एकंदरीत राहिलेली मानसिकता, देश व राज्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील त्यांचे योगदान , शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या समस्या, सहकार क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, बेरोजगारी याबाबत त्यांची राहीलेली भूमिका ही खऱ्या अर्थाने कशी विवादास्पद आहे याची माहिती या पुस्तकात मी मांडली आहे असे पाटील यांनी सांगितले.
शरद पवार यांची आरक्षण संबंधी भूमिका, एन्रॉन प्रकरण, गोवारी हत्याकांड, मावळमधील शेतकरी हत्याकांड, आदिवासी समाजाची दुर्दशा, नामांतर आंदोलन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरीब मराठ्यांना उध्वस्त करणारे धोरण, सहकारी साखर कारखाने व सुत गिरण्यांवरील दरोडे, लवासा व इतर जमीन घोटाळे, सिंचन घोटाळा, मुंबई मधील भूखंड घोटाळे, शिखर बँक घोटाळा, आयपीएल घोटाळा, बनावट मुद्रांक व टुजी स्पेक्ट्रम घोटाळे, डि प्लस झोन व एमआयडीसी मधील सबसिडी व जमीन घोटाळे, कृषी कर्जमाफी व अनुदान घोटाळे या विविध प्रकरणांसोबत महाराष्ट्रातील काका पुतण्या वादशी थेट संबंध सोबतच सार्वजनिक क्षेत्रातील रयत शिक्षण संस्था, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, मराठा मंदिर संस्था या व इतर अनेक संस्था बेकायदेशीर व अनैतिक मार्गाने शरद पवार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कब्जात घेऊन बळकावल्या आहेत याची माहिती या पुस्तकात आहे असे पाटील यांनी सांगितले.
शरद पवार हे व्यक्तिमत्त्व समजून घ्यायचे असल्यास ” शरद पवार ही व्यक्ती नसून राजकीय प्रक्रियेचे प्रतिनिधित्व आहे.” हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला शरद पवार हा विषय समजणार नाही. पवारांची राजकीय निती म्हणजे ज्यांना विचारायचे त्यांना ते विचारतात आणि बाकीच्यांना गृहीत धरतात. पवारांचा असा स्वभाव राहिला आहे की, सत्तेसाठी सौदा करायचा पण त्याला एक वैचारिक मुलामा द्यायचा. ही तुझी किंमत उचल आणि कामाला लाग हे पवारांच्या राजकारणाचे महत्त्वाचे सूत्र या पुस्तकात मांडली आहे.
देशात व महाराष्ट्र राज्यात पवारांना कधीच वैचारिक नेता म्हणून पाहिले गेलेले नाही.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर्थिक हितसंबंधातून बंधण्याऐवजी विचारांवर बांधला असता तर सख्ख्या पुतण्याने पक्ष असा ढगफुटी सारखा फोडला नसता. जे पेरलं तेच उगवते, हा निसर्ग नियम आहे. १९७८ च्या पुलोद प्रयोगानंतर राज्याच्या राजकारणाला अतिशय वेगळे, स्वयंकेंद्रित, खुर्ची, सत्ता, भ्रष्ट्राचार व या सर्वामधील अनैतिक बाबींना बळ मिळाले आहे.
सत्तेसाठी काहीपण, कोणत्याही थराला जाण्याचा हा नवा मंत्र त्यांनी देशाच्या राजकीय पटलावर आणून त्याची अंमलबजावणी केली आहे असे पाटील म्हणाले.
देशाच्या व राज्याच्या राजकारण व समाजकारणाला विधायक व सकारात्मक वळण देऊन विकास कामांची गती वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित होते. तशा अनेक संधी त्यांना वेळोवेळी मिळाल्या देखील होत्या. दुर्दैवाने या मिळालेल्या संधी त्यांची वर्तणूक व दगाबाज स्वभावामुळे अशा सुवर्णसंधी त्यांनी गमाविल्या. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शरद पवार कधीही अभ्यासू, दूरदृष्टी व बुद्धिमान नेते नव्हते.असे पाटील यांनी सांगितले.
स्वतःबद्दलची चांगली प्रतिमा त्यांनी जाणीवपूर्वक तयार केली आहे.शरद पवारांची नेहमीच आयत्या बिलावर नागोबा अशी भूमिका राहिली आहे. त्यांची सहा दशकांतील राजकीय वाटचाल अभ्यासल्यास ते भ्रष्टाचारी व दरोडेखोर वाटतात. त्यांची सर्वच धोरणे, योजना व कार्यक्रम या प्रथम स्वतःसाठीच असतात. त्यांचे राज्य, देश व किंबहुना ज्या जातीचे ते आहेत त्यांचेही ते होऊ शकलेले नाहीत. ही वास्तवता आहे. असे पाटील यांनी सांगितले.
“दगाबाज” हे लेखक म्हणून माझे व “अदिती प्रकाशन संस्थेचे हे पहिलेच पुस्तक आहे. आम्हाला मुंबईत प्रकाशक मिळाले नाहीत म्हणून आम्ही दिल्ली येथे हे पुस्तक प्रकाशित केले. असे पाटील यांनी सांगितले. संपादक सुशील कुलकर्णी यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले.यावेळी कुलकर्णी म्हणाले , शरद पवार यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याचे जिवंत उदाहरण म्हणजे सहकार विभाग आहे. ज्येष्ठ समाजसेवक सुरींदर अरोरा. आर पी सिंग , भरत नीचीते , उदय कठे उपस्थित होते.