Sunday, September 21, 2025
घरमहाराष्ट्र"हर घर संविधान" मळाई ग्रुपचा नाविन्यपूर्ण उपक्रम....

“हर घर संविधान” मळाई ग्रुपचा नाविन्यपूर्ण उपक्रम….

कराड(विजया माने) : दि.26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले.लोकांकडून त्याच्या प्रस्तावनेच्या घोषणेसह ते स्वीकारले गेले.आज भारताच्या जगातील सर्वात मोठ्या लिखित राष्ट्रीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी होत आहे.श्री मळाई ग्रुप व समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय, मलकापूर यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मान्यवर व्याख्यात्यांची व्याख्याने आयोजित केली जातात.
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री अशोकराव थोरात यांच्या संकल्पनेतून ” हर घर संविधान” वाचकांच्या व समाजातील विविध स्तरातील मान्यवरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संविधान प्रेमी वाचकांना भेट म्हणून गुरुवार दि. 17/4/2025 रोजी आदर्श ज्युनियर कॉलेज,मलकापूर येथे पूर्व नोंदणी केलेल्यांना संविधानाची प्रत मोफत दिली जाईल.
हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता,संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये, मूलभूत अधिकार,मार्गदर्शक तत्वे तसेच नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो.संसद सुद्धा राज्यघटनेला डावलू शकत नाही.त्यामुळे भारतीय संविधान सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे.
भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. दि.15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वातंत्र्य झाल्यावर देशाचा कारभार कसा चालवायचा? कारण संविधानाशिवाय देश चालत नाही. निरनिराळ्या जाती,धर्म,पंथ,वर्ण अशा विविधतेने नटलेल्या भारताची राज्यघटना कशी असावी हा प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभ भाई पटेल यांना पडला होता.डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे अध्यक्षतेखाली संविधान सभेची स्थापना झाली. मसुदा समितीतील एन.माधवराव सय्यद,सादुल्ला,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सर बी.एन.राव (संविधान सल्लागार) एस.एन.मुखर्जी,जुगल किशोर खन्ना व केवल कृष्ण,शामाप्रसाद मुखर्जी,मौलाना अबुल कलाम व अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी दि. 29 ऑगस्ट 1947 रोजी सोपविली गेली.
या सर्वांनी ती समर्थपणे पेलून दोन वर्षे 11 महिने 18 दिवस अहोरात्र मेहनत करून देशाची राज्यघटना लिहिली. म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते.
दि.26 नोव्हेंबर 1950 रोजी रोजी देशाच्या संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली त्यामुळे याच दिवशी भारतभर ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. यालाच “राष्ट्रीय विधी दिन ” असेही म्हणतात. संविधानामुळेच आपण स्वतंत्र,सार्वभौम राष्ट्राचे स्वतंत्र नागरिक आहोत.राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करतात.त्यातील मूलभूत हक्क व कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदारीची आठवण करून देतात म्हणून संविधान वाचणे,माहीत असणे हे फार महत्त्वाचे आहे.
भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्क,अधिकार,कर्तव्ये,उद्देशिका, सरकारसाठी मार्गदर्शक तत्वे, सत्ता, संघराज्य प्रणाली, आणीबाणी विषयक तरतुदी व जबाबदारी यांची दिशा ठरविणारा ऐतिहासिक ग्रंथ म्हणजे संविधान होय. ज्याने सर्वांना एक संघ बांधण्याचे काम केले आहे स्वातंत्र्य ,समता, बंधुता व न्याय या मूल्यांची जोपासना करून मिळालेल्या अधिकारांची जाणीव प्रत्येकाला व्हावी यासाठी शालेय अभ्यासक्रमात संविधानाचे महत्त्व या विषयाचा समावेश केला आहे.
एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या जीवनामध्ये असलेले संविधानाचे अस्तित्व समजून घेणे सामाजिक, आर्थिक,मौलिक विचार अंतर्भूत करून देशात सर्वच बाबतीत विविधता असतानाही प्रत्येकाला स्वाभिमानाचे हक्क संविधानामुळेच प्रदान केलेले आहेत. जगातील सर्वात मोठी 24 प्रकरणे 451 कलमे व दोन परिशिष्टे असणारी 12000 पानांची घटना एकूण 11 सत्रे 17 व 165 बैठका घेऊन तयार झाली. यावरून आपली राज्यघटना किती प्रदीर्घ व मौल्यवान आहे हे समजते. लोकशाही तत्वावर लोकांनी लोकांचे लोकांच्यासाठी चालवलेले राज्य चालते.विविधता ही भाषा, संस्कृती,खाद्यपदार्थ,कपडे,आचार विचार,धर्म,जाती पंथाच्या बाबतीत असूनही भारत एकसंघ उभा आहे. भारतीय संस्कृती संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते, म्हणूनच मानवी मूल्ये जपणारे लोकांना स्वातंत्र्य देऊन रक्षा करणारे प्रत्येक जाती धर्म पंथ व त्यांच्या ग्रंथांचा आदर करणारे सर्वधर्मसमभाव यांचा आदर करणारे स्त्री-पुरुष यांना समान दर्जा देणारे व सर्वांना बंधू भावाने वागायला शिकविणारे संविधान अभ्यासले तर या महामानवाने लिहिलेल्या आदर्श मुल्यांचा अंगीकार करून आणि प्रगत लोकशाही राष्ट्राच्या उभारणीसाठी प्रत्येक नागरिकांचे योगदान यामुळे भारत महासत्ता बनू शकेल यात तीळ मात्र शंका नाही.
—————————–
प्राध्यापिका- सौ.शीला दिलीप पाटील
आ.च.विद्यालय व आदर्श ज्युनियर कॉलेज.मलकापूर ता.कराड

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments