ताज्या बातम्या

मच्छिमार व्यवसायीकांच्या प्रश्नी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – खा.वर्षा गायकवाड

मुंबई : ससून डॉक येथे १०० वर्षांपासून सुरु असलेल्या फिशिंग बोटींचे काम नवी मुंबईतील उरण कारंजा येथे हलवल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या जवळपास १० हजार लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना बेरोजगारीच्या खाईत लोटणे अन्यायकारक आहे. सरकारने ससून डॉकमध्ये मच्छिमारी व्यवसाय करणारे व त्यांच्याशी संबंधित लोकांच्या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.

खासदार वर्षा गायकवाड यांनी ससून डॉकला भेट देऊन मच्छिमार व्यवसायिकांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष रवी बावकर, पुरण दोषी, ऍड रवी जाधव, अशोक गर्ग, हिना गजाली आदी उपस्थित होते.

ससून डॉक मधील फिशिंग बोटींचे काम १५ ऑगस्ट २०२४ पासून उरणला हलवण्यात आले आहे त्यामुळे या व्यवसावर अवलंबून असलेले कामगार, बर्फ पुरवठादार, हातगाडी कामगार, महिला व ठेलेवाले अशा सर्वांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.आधीच रोजगाराच्या संधी कमी होत आहेत तर दुसरीकडे महागाईची समस्या आहे, यामुळे कामगारवर्गांचे हाल होत आहेत अशा परिस्थितीत सरकारने निर्णय घेताना या कामगारांचा विचार करायला हवा होता. या प्रकरणी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन न्याय देण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top