मुंबई : मुंबई पब्लिक स्कूल, एसएससी बोर्ड, उलन मिल, माहीम येथे द लाईफ फाउंडेशन यांच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करणारा सुंदर आणि स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती वखारिया मॅडम यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आणि पालकांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व सजावटीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. गणेशमूर्ती तयार करताना शाडूच्या मातीचा वापर करावा, प्लास्टर ऑफ पॅरिस (POP), रासायनिक रंग तसेच थर्माकोलचा वापर टाळावा, असा संदेश देण्यात आला.
या उपक्रमाला पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालकांनी आपल्या मुलांसोबत शाडूच्या मातीपासून सुंदर गणेशमूर्ती तयार केल्या. तसेच सजावटीसाठी कागद, पुठ्ठा आणि इतर पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक सजावट केली.
गणेशोत्सवात मोठ्या आवाजातील डीजे आणि ध्वनिप्रदूषण टाळून पारंपरिक ढोल-लेझीम व इतर पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून बाप्पाचे स्वागत करण्याचे आवाहनही करण्यात आले. पूर्वीच्या काळाप्रमाणे साधेपणाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
“बाप्पाची भक्तीही जपूया आणि पर्यावरणाचीही काळजी घेऊया,” असा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांसोबत पालकांचा सहभाग आणि मुख्याध्यापिका ज्योती वखारिया मॅडम यांच्या नेतृत्वामुळे हा उपक्रम विशेष ठरला. आगामी गणेशोत्सवात प्रत्येकाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि पर्यावरणपूरक सजावटीचा संकल्प करावा, असे आवाहन लाईफ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.




