ताज्या बातम्या

जलसंधारण सप्ताहानिमित्त नमुंमपा सर्वसाधारण सभेत जलसंधारण प्रतिज्ञा ग्रहण

नवी मुंबई :21 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’ पाळला जातो.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही जलसंधारण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात सर्वसाधारण सभेप्रसंगी महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी जलसंधारण दिनाचे महत्व सांगत व्यासपीठावर उपस्थित अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांचेसह सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, पत्रकार यांच्यासह जलसंधारणाची सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण केली. प्रत्येकाने आपल्या परीने जलसंधारणासाठी जागरूक प्रयत्न घेण्याचे आवाहनही महापौर महोदयांनी केले.

माजी मुख्यमंत्री व जलतज्ज्ञ सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रसारित करीत राज्यातील जलसंधारण कार्याला गती दिली. त्यास अनुसरून पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी जनजागृती करणे, जलसंधारणाच्या कामांमध्ये जनसहभाग वाढविणे तसेच मृद व जलसंधारणाचे महत्त्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे ही उद्दिष्टये प्रसारित करण्यासाठी जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते.

नवी मुंबई महानगरपालिकेनेही जलसंधारण सप्ताह अंतर्गत ठिकठिकाणी बॅनर्स लावून तसेच डिजीटल होर्डींगव्दारे या मोहीमेचा प्रसार केला. महापालिका मुख्यालयासह सर्व जलकुंभाच्या ठिकाणी जलसंधारणाची शपथ – माझ्या देशाच्या आणि राज्याच्या शाश्वत विकासासाठी पाणी व मातीचे संवर्धन करणे हे माझे कर्तव्य समजेन. मी माझ्या दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करेन. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची पूर्ण काळजी घेईन. पावसाचे पाणी अडवणे, जिरवणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे रक्षण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. माझ्या परिसरात व समाजामध्ये पाण्याचे महत्त्व पटवून देऊन जलसाक्षरतेमध्ये भर घालीन, असा संकल्प मी आज करत आहे. – अशा शब्दात घेण्यात आली.

Scroll to Top