मुंबई (शांताराम गुडेकर ) : श्री कांडकरी विकास मंडळ, कासार कोळवण आयोजित “विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६” हा शैक्षणिक कार्यक्रम रविवारी दादर येथील पर्ल सेंटर येथे मोठ्या उत्साहपूर्ण, आनंददायी आणि कौटुंबिक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.श्री कांडकरी विकास मंडळ हे गेली ३४ वर्षे कासारकोळवण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. उत्तमरित्या शिक्षण घेत कारकीर्द घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना शाबासकी आणि पुढील करिअरला शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यासाठी मंडळ नेहमीच अग्रेसर असते.
विद्यार्थ्यांच्या कौतुकात रंगलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि सरस्वती पुजनाने झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री
दिलीप शांताराम तोरस्कर सर यांनी केले. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष आणि इतर सन्माननीय मान्यवर आवर्जून उपस्थित होते. दहावी, बारावी, पदवीधर तसेच विविध शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी आणि शैक्षणिक साहित्य देवून गौरविण्यात आले. श्री. दिलीप शांताराम तोरस्कर सर आणि श्री नितीन शांताराम तोरस्कर या बंधूंनी आपल्या शिक्षणप्रेमी वडील स्वर्गीय शांताराम बाबाजी तोरस्कर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आकर्षक ट्रॉफी देवून विद्यार्थ्यांचा सत्कार केला. शिक्षणाला सर्वोच्च महत्व देणाऱ्या समाजशील वडीलांचे सामाजिक भान लक्षात ठेवून पुरस्कार देणाऱ्या या बंधूंचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शनपर विचार प्रेरणादायी होते. मंडळाचे कार्याध्यक्ष अशोक तोरस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यापुढेही यशाची कमान अशीच ठेवत यशवंत व्हा हा गुरुमंत्र दिला. मंडळाचे सचिव राजाराम रावणंग यांचे खुशखुशीत रंगतदार भाषण म्हणजे विद्यार्थ्यांना वैचारिक मेजवानीच होती. रामायणातील दाखले देत त्यांनी निश्चित ध्येयाचा पाठलाग कसा करावा हे पटवून दिले. गावातील एक उच्च विद्याविभुषित उदयोन्मुख शिक्षक संकेत संतोष तोरस्कर यांनी आपल्या उत्कृष्ट विचारांनी सर्वांचे मन जिंकले. दिपक करंबेळे,निलेश करंबेळे, सचिन घडशी तरूणांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी मंडळाला धन्यवाद देत कृतज्ञता व्यक्त केली.
मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष विठ्ठल करंबेळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अनेक मार्मिक आणि सडेतोड विचार मांडून विद्यार्थ्यांना आणि पालकांना बदलत्या शिक्षण प्रणालीची आठवण करून दिली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य,युवा कार्यकर्ते आणि सल्लागार यांनी मोलाचे योगदान दिले. आजचा विद्यार्थी उद्याचा आदर्श नागरिक आहे. या विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित नागरिक घडवण्याचा मंडळाचा हा शैक्षणिक कार्यक्रम निश्चितपणे समाजाला प्रगतीपथावर जाण्यास मोलाची कामगिरी ठरत आहे.




