मुंबई(शांताराम गुडेकर ) : कनकिया सिलिकॉन व्हॅली (KSV) शाखेच्या कराटेपटूंनी प्रियदर्शी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुलुंड येथे झालेल्या २०व्या स्वाभिमान भारत कप – ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाखेचा गौरव वाढवला.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत KSV शाखेच्या ७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत १३ पदकांची कमाई केली, ज्यामध्ये ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कौशल्य, आत्मविश्वास, शिस्त आणि मेहनतीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत आपल्या कामगिरीची छाप उमटवली.
या शानदार कामगिरीसोबतच सिनियर कोच सेन्सी रितिका भोसले यांना ‘बेस्ट कोच ऑफ द इयर २०२६’ या मानाचा पुरस्कार मिळाला. हा सन्मान त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, मेहनत आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाची पावती आहे.या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्य आणि संघभावना महत्त्वाची ठरली. हेड कोच रेन्शी फ्राझ शेख, सिनियर कोच सेन्सी रितिका भोसले आणि सेन्सी आशिष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी कठोर परिश्रम घेतले.
७ विद्यार्थ्यांनी १३ पदकांसह केलेली ही शानदार कामगिरी आणि सेन्सी रितिका भोसले यांना मिळालेला ‘बेस्ट कोच ऑफ द इयर २०२६’ हा सन्मान KSV शाखेसाठी अभिमानाचा क्षण आहे. सर्व विद्यार्थ्यांचे आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.




