ताज्या बातम्या

साळशिरंबे (खुडेवाडी) गावाच्या विकासासाठी आमदार डॉ. अतुल (बाबा) भोसले यांना निवेदन; तात्काळ २२ लाख रुपयांचा निधी मंजूर

कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील साळशिरंबे (खुडेवाडी) गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लागावीत आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने कराड दक्षिणचे आमदार मा. डॉ. अतुल (बाबा) भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. ग्रामस्थांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत आमदार डॉ. भोसले यांनी तात्काळ २२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून गावाच्या विकासाला प्रत्यक्ष सुरुवात करून दिली.

ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनामध्ये श्री हनुमान मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, नवीन गावठाणात बंदिस्त गटर बांधणे, पुलाशेजारी संरक्षण भिंत उभारणे, श्री हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे, अरविंद यादव यांच्या घरापासून शरद साळुंखे यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता करणे, विनोद कांबळे यांच्या घरापासून सुधीर चोपडे यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटर बांधणे, महारकी येथील पाझर तलावाची दुरुस्ती करणे, नवीन वाढीव वस्तीमध्ये वीज पोल उभारणे, शेत पाणंद रस्त्यांची कामे करणे, खुडेवाडी येथे सभामंडप व अंतर्गत काँक्रीट रस्ता बांधणे, जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन वर्गखोली उभारणे तसेच गावठाणातील ग्रामपंचायतीच्या जागेत क्रीडा मैदान विकसित करून आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

या मागण्यांपैकी श्री हनुमान मंदिरासमोरील पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून ७ लाख रुपये, तसेच जिल्हा परिषद शाळेची नवीन वर्गखोली बांधण्यासाठी कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून १५ लाख रुपये असा एकूण २२ लाख रुपयांचा निधी आमदार डॉ. अतुल (बाबा) भोसले यांनी तात्काळ मंजूर केला.

यावेळी आमदार डॉ. भोसले यांनी साळशिरंबे (खुडेवाडी) गावातील उर्वरित सर्व विकासकामेही प्राधान्याने टप्प्या-टप्प्याने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही दिली. गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसून प्रत्येक आवश्यक काम पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदारांच्या या सकारात्मक निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून गावातील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे पंकज पाटील यांनी सांगितले.

यावेळी भाजपा सोशल मीडिया सातारा जिल्हाध्यक्ष पंकज पाटील, माजी उपसरपंच वसंतराव मोहिते, बुथ अध्यक्ष तानाजी पवार, विलास चवरे, अंकुश पाटील, हणमंत यादव, दादासो पाटील, सौरभ चवरे, अभिराज पाटील, संकेत पाटील, गणेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top