ताज्या बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त दादर–पंढरपूर विशेष रेल्वे; २४ व २६ जुलैला धावणार

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दादर–पंढरपूरदरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्या २४ जुलै आणि २६ जुलै रोजी धावणार असून, मुंबईसह पुणे मार्गावरील प्रवाशांनाही त्याचा लाभ होणार आहे.
गाडी क्रमांक ०१०४५ ही विशेष रेल्वे २४ जुलै रोजी दुपारी १२.५० वाजता दादर स्थानकातून सुटून रात्री ९.१५ वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. परतीसाठी गाडी क्रमांक ०१०४६ ही विशेष रेल्वे २६ जुलै रोजी रात्री १२.१५ वाजता पंढरपूरहून सुटून त्याच दिवशी सकाळी ११.४५ वाजता दादर येथे दाखल होईल.
या विशेष रेल्वेला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. गाडीत दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी (एसी-३ टियर), दहा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी तसेच दोन द्वितीय आसनांसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
या विशेष गाड्यांसाठीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाले असून, प्रवाशांची संख्या वाढल्यास आणखी विशेष गाड्या चालविण्याचा विचार मध्य रेल्वेकडून करण्यात येणार आहे.

Scroll to Top