ताज्या बातम्या

ऐरोली रूग्णालय घटनेतील चौकशी समितीचा अहवाल सभागृहासमोर सादर

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयात दि.01 जुलै 2026 रोजी श्रीम. सोनम डोंगरे, श्रीम. रिचा मिश्रा यांना औषधोपचारा दरम्यान तीव्र प्रतिकूल औषध प्रतिक्रिया झाली होती व त्यामध्ये श्रीम. सोनम डोंगरे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी करण्यासाठी महानगरपालिकेने डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे, डॉ. विजय कल्याणकर, विभाग प्रमुख स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ, जे.जे. रूग्णालय, मुंबई व डॉ. सुचिता किंजवडेकर, सदस्य नवी मुंबई स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र संघटना यांची समिती नेमली होती. समितीचे अध्यक्ष यांनी सूचित केल्यानुसार या समितीत न्यायवैद्यकशास्त्र, औषध निर्माण शास्त्र व बधिरीकरण तज्ञ अशा 3 सदस्याची वाढीव नियुक्ती करण्यात आली व त्यानुसार समितीस सदर घटनेची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच, दि.01/07/2026 रोजी श्रीम. प्रतिमा पाल यांना उपचारादरम्यान अस्वस्थ झाल्याची माहिती निर्दशनास आली त्याचप्रमाणे, दि.17/03/2026 रोजी श्रीम. प्रतिक्षा खांडेकर यांच्या मृत्यूबद्दलची चौकशी करण्याची जबाबदारी सदर समितीस देण्यात आली.

सदर गठीत चौकशी समितीने राजमाता जिजाऊ रूग्णालय, ऐरोली येथे श्रीम. सोनम डोंगरे, श्रीम. रिचा मिश्रा आणि श्रीमती प्रतिमा पाल यांच्या प्रकरणाबाबत दि.08/07/2026 रोजी प्रत्यक्ष जाऊन सदर प्रकरणी संबंधित सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी केलेली आहे.

जे.जे. रूग्णालय यांनी सादर केलेला PM Report, वापरलेला औषधांचा तपशील, त्यावरील मुद्रीत माहिती, कालबाह्य होण्याचा दिनांक, प्रसुतीगृह व अवलंबलेली औषध प्रणाली यांचा सर्वागीण अभ्यास करून समितीचा प्राथमिक अहवाल दि. 20/07/2026 रोजी सादर केलेला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सदर प्राप्त अहवाल नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडला असून सदर अहवालाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांनी सभागृहात वाचन केले तसेच, सदर अहवालाचे विश्लेषण आयुक्तांनी सदस्यांपुढे केले.

चौकशी समितीच्या अहवालात, श्रीमती प्रतिमा पाल यांना इंजेक्शन आयसॉक्सुप्रिन एचसीएलचा (Inj. Isoxsuprine HCL) अत्यंत सौम्य दुष्परिणाम झाला होता, तर श्रीमती रिचा मिश्रा यांना मध्यम स्वरूपाचा दुष्परिणाम झाला, त्यामुळे दोन्ही रुग्ण वाचल्या असून श्रीमती सोनम डोंगरे यांना इंजेक्शन डेक्सामेथासोन १२ मिग्रॅ (Inj. Dexamethasone 12mg) ची तीव्र प्रतिकूल औषध प्रतिक्रिया झाली तसेच अन्न श्वासनलिकेत गेल्याने (food aspiration) गुंतागुंत वाढली. त्यामुळे त्यांना वाचवता आले नाही आणि अखेरीस त्यांचे निधन झाले असे नमुद केले आहे.

श्रीमती सोनम डोंगरे यांचा मृत्यू औषधाच्या ॲनाफिलेक्टिक प्रतिक्रियेमुळे (Anaphylactic reaction) झाला असून, यात डॉक्टरांचा कोणताही निष्काळजीपणा आढळलेला नाही असे अहवालात निष्कर्ष काढला आहे. तसेच, सदर अहवाल हा प्राथमिक अंतरिम अहवाल असून अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून औषधाबाबतचा अहवाल तसेच, जे. जे. रूग्णालयाकडून येणारा अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निष्कर्षात बदल होऊ शकतात असे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याची संपूर्ण माहिती सभागृहापुढे सादर करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रूग्णालय, ऐरोली येथील रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी रूग्णांची योग्य ती काळजी घेतलेली असून त्यांनी कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही असे अहवालात नमूद केल्यानुसार प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे.

त्या अनुषंगाने, महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांना यापुढील काळात अधिक उत्तम सेवा देण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाईल असे सांगितले.

Scroll to Top