ताज्या बातम्या

पात्र फेरीवाल्यांनी परवाना विकू नये; संघटित राहून हक्कांचे संरक्षण करा : गणेश खणकर

मुंबई, दि. १७ जुलै : महाराष्ट्र हॉकर्स संघ (भारतीय मजदूर संघ) यांच्या वतीने आयोजित पात्र फेरीवाला संमेलन शुक्रवारी दादर (पूर्व) येथील वसंत स्मृती सभागृहात उत्साहात पार पडले. महाराष्ट्र हॉकर्स संघ (भारतीय मजदूर संघ) महाराष्ट्र राज्याचे सचिव शिवाजी सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या संमेलनात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी फेरीवाल्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जितेंद्र राऊत, प्रतिक कर्पे, शितल गंभीर, किरण मिलगीर, संदीप कदम तसेच महाराष्ट्र हॉकर्स संघाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने पात्र फेरीवाले उपस्थित होते.
गणेश खणकर म्हणाले, “क्यूआर कोडसह अधिकृत परवाना मिळाल्यानंतर अनेक जण तो पैशासाठी विकत घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र कोणत्याही मोहाला बळी पडू नका. ही संधी पुन्हा मिळणार नाही. पात्र फेरीवाल्यांचे हक्क अबाधित राहावेत, यासाठी सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.”
मुंबईतील अनेक कष्टकरी फेरीवाल्यांना उपजीविकेसाठी संघर्ष करावा लागत असून काही ठिकाणी अनधिकृत अतिक्रमणामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माहीम परिसरातील काही फेरीवाल्यांना होत असलेल्या त्रासाबाबत प्रशासनाशी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
“महापालिकेला पादचारी आणि फेरीवाले यांच्यात समतोल राखण्याची जबाबदारी आहे. जिथे शक्य असेल तिथे पात्र फेरीवाल्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. जात, धर्म किंवा भाषेच्या राजकारणापासून दूर राहून सर्वांनी संघटित राहावे. संघटित शक्तीमुळेच फेरीवाल्यांचे हक्क आणि रोजगार सुरक्षित राहतील,” असे आवाहन गणेश खणकर यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र हॉकर्स संघ (भारतीय मजदूर संघ) महाराष्ट्र राज्याचे सचिव शिवाजी सुळे यांनीही पात्र फेरीवाल्यांनी कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संघटित राहून शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.

Scroll to Top