ताज्या बातम्या

मुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र गांगण रिंगणात; मंत्रालय पत्रकारांकडून विजयाच्या शुभेच्छा

मुंबई : मुंबई प्रेस क्लबच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, संघटनात्मक नेतृत्व आणि पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सातत्याने घेतलेली भूमिका यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे पत्रकार क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे.
यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी तसेच मंत्रालयातील पत्रकारांनी सुरेंद्र गांगण यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.

“मुंबई प्रेस क्लब ही केवळ एक संस्था नसून पत्रकारांच्या हक्कांचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि व्यावसायिक मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या संस्थेला सक्षम, अनुभवी आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे. सुरेंद्र गांगण यांच्या नेतृत्वाखाली प्रेस क्लब अधिक गतिमान, पारदर्शक आणि पत्रकाराभिमुख होईल,” असा विश्वास उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केला.

सुरेंद्र गांगण यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत नवे समीकरण निर्माण झाले असून, पत्रकारांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे आणि सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व पत्रकारांनी त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा देत, आगामी निवडणुकीत त्यांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Scroll to Top