ताज्या बातम्या

MSCB विभागाचा भोंगळ कारभार? निकृष्ट दर्जाच्या पोल उभारणीचा फटका; विठ्ठलवाडी-तुळसण येथे विद्युत पोल कोसळला

कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील विठ्ठलवाडी-तुळसण परिसरात महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (MSCB/MSEDCL) विभागाने उभारलेला विद्युत पोल अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र, मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वीही अशा कामांबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही विभागाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी कोसळलेला पोल तातडीने हटवून सुरक्षित आणि दर्जेदार नवीन पोल उभारण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.
वारंवार तक्रारी आणि बातम्या प्रसिद्ध होऊनही विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, भविष्यात अशा दुर्घटनांमुळे जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Scroll to Top