कराड(प्रताप भणगे) : तुळसण फाटा येथील ओढ्यावरील पुलाला मोठे झाड अडकून पडल्याने पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या पावसाळ्यामुळे ओढ्यात पाण्याचा प्रवाह वाढत असून, अडकलेल्या झाडामुळे पाण्याचा निचरा अडथळला जाऊन पुलावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी या धोकादायक परिस्थितीकडे संबंधित बांधकाम विभागाचे लक्ष वेधले असून, तातडीने झाड हटवून पुलाची पाहणी करण्याची मागणी केली आहे. वेळेत कारवाई न झाल्यास पुलाचे नुकसान होण्याबरोबरच वाहतूक विस्कळीत होण्याची आणि मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
“दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ यंत्रणा पाठवून पुलाला अडकलेले झाड हटवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.




