ताज्या बातम्या

पाचवड फाटा–येळगाव फाटा मार्गावर पांढरे पट्टे गायब; झेब्रा क्रॉसिंगही नामशेष, अपघाताची प्रशासन वाट पाहत आहे का?

कराड : पाचवड फाटा ते येळगाव फाटा या वर्दळीच्या मार्गावरील रस्त्यावरील पांढरे लेन मार्किंग आणि झेब्रा क्रॉसिंग पूर्णपणे पुसट झाल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात वाहनचालकांसमोर मोठे आव्हान निर्माण होत असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
रस्त्यावरील पांढरे पट्टे आणि झेब्रा क्रॉसिंग हे वाहतूक सुरक्षिततेचे महत्त्वाचे घटक आहेत. मात्र संबंधित विभागाकडून त्यांची देखभाल न झाल्याने या मार्गावरील मार्किंग जवळपास नाहीसे झाले आहे. परिणामी वाहनचालकांना लेनचा अंदाज लागत नाही, तर पादचाऱ्यांनाही जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार लक्ष वेधूनही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांनी तातडीने संपूर्ण मार्गावर पांढरे पट्टे, लेन मार्किंग आणि झेब्रा क्रॉसिंग नव्याने रंगवून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.

Scroll to Top