नवी मुंबई : नवी मुंबईत शनिवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 4.30 या आठ तासांच्या कालावधीत सरासरी 113.20 मिमी मुसळधार पावसाची नोंद झाली. यामध्ये ऐरोलीत सर्वाधिक 161 मिमी, तर दिघा 134.60 मिमी आणि कोपरखैरणे 131.40 मिमी पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी केल्याने नवी मुंबई महापालिकेने संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अभियांत्रिकी, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, उद्यान आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर उपस्थित राहून मदतकार्य करण्याचे निर्देश दिले होते. सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी मिळताच तातडीने पाण्याचा निचरा करण्यात आला असून आवश्यक ठिकाणी अतिरिक्त पंपही कार्यान्वित करण्यात आले.
महापौर सुजाता पाटील यांनीही प्रत्यक्ष पाणी साचलेल्या भागांची पाहणी करून अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
दुपारी 2.50 वाजता 4.26 मीटर उंच भरती आणि मुसळधार पावसामुळे काही सखल भागांत पाणी साचले. या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात 10 झाडे पडणे, एका झाडाची फांदी पडणे आणि 11 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या असून सर्व ठिकाणी तत्काळ कार्यवाही करण्यात आली.
महापालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे, सखल भाग, समुद्रकिनारा आणि पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळण्याचे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.




