ताज्या बातम्या

शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी; आता मिळणार अधिक दर्जेदार तांदूळ, केंद्राचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील 80 कोटींहून अधिक लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत शासकीय शिधावाटपातून दिल्या जाणाऱ्या तांदळाची गुणवत्ता सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत वितरित होणाऱ्या तांदळात तुटलेल्या (तुकडा) तांदळाचे प्रमाण आता 25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार आहे.
केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती देताना सांगितले की, गेल्या तीन दशकांनंतर प्रथमच शिधावाटपातील तांदळाच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा करण्यात येत आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना अधिक चांगल्या दर्जाचे धान्य मिळणार असून त्यांच्या अन्नाच्या गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा होईल.
उरलेल्या तुकडा तांदळाचा असा होणार वापर
तांदळातील तुटलेल्या धान्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर उरणाऱ्या तुकडा तांदळाचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी तसेच पाळीव प्राण्यांच्या खाद्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे धान्याचा अपव्ययही टळणार आहे.
मोफत धान्य योजनेत कोणताही बदल नाही
या निर्णयामुळे लाभार्थ्यांना कोणताही अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार नाही. यापूर्वीप्रमाणेच पात्र कुटुंबांना मोफत धान्य मिळत राहणार आहे. मात्र, आता त्यांना अधिक दर्जेदार तांदूळ उपलब्ध होणार आहे. तसेच वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारकडून QR-कोड आधारित ट्रॅकिंग प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
योजनेअंतर्गत लाभ
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला दरमहा 5 किलो मोफत धान्य (गहू किंवा तांदूळ) दिले जाते. तर अंत्योदय अन्न योजनेतील अतिगरीब कुटुंबांना दरमहा 35 किलो मोफत अन्नधान्याचा लाभ दिला जातो. केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी लाभार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण अन्नधान्य उपलब्ध होणार आहे.

Scroll to Top