नवी मुंबई : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांत पाणी साचून नागरिकांना झालेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर महापौर सुजाता पाटील यांनी विशेष आढावा बैठक घेत प्रशासनाला सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. बेलापूर ते दिघापर्यंत प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रत्येक पाणी साचणाऱ्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले.
बैठकीला उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अतिसखल भागांतील वॉटर एन्ट्रीज तातडीने खुल्या ठेवणे, पावसात कचरा साचू न देणे तसेच मदत यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले.
एलपी सिग्नलजवळ उघड्या विद्युत तारेमुळे दोन मुली जखमी झालेल्या घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यास सांगण्यात आले. तसेच महापालिका व महावितरणने संयुक्त पाहणी करून धोकादायक ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले.
रुग्णालयातील गरोदर महिलेच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून प्राथमिक निष्काळजीपणा करणाऱ्यांवरही कारवाईचे निर्देश देण्यात आले. सर्व शाळा, कोचिंग क्लासेस व ट्युशन केंद्रांचे स्ट्रक्चरल आणि अग्निसुरक्षा ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले. नागरिकांनी आपत्कालीन मदतीसाठी 1800222309 किंवा 1800222310 या टोल-फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन महापौरांनी केले.




