मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंड करत शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश केल्याने सत्तासमीकरणांबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. या पक्षप्रवेशानंतर शिंदे गटातील खासदारांची संख्या ७ वरून १३ झाली असून महायुतीतील सर्वाधिक खासदार असलेला घटक पक्ष म्हणून शिंदे गटाची ताकद वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच यावर स्पष्ट भूमिका मांडत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
एका वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले, “ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागांची आवश्यकता असते आणि ज्या पक्षाकडे स्वतःचे १३७ निवडून आलेले आमदार आहेत, त्या राज्याचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा राहणार की इतर पक्षाचा? अर्थात त्याच पक्षाचा राहणार. त्यामुळे कितीही कहाण्या किंवा चर्चा रंगल्या तरी वास्तव मला आणि शिंदे साहेबांनाही माहीत आहे. त्यामुळे अशा बातम्यांनी ना मी विचलित होतो, ना शिंदे साहेब. प्रत्येकाला आपली स्वप्ने पूर्ण व्हावीत असे वाटते, त्यात गैर काहीच नाही.”
‘निधी न मिळणे’ हे एक कारण असू शकते
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्यामागे “मतदारसंघाला निधी मिळत नव्हता” हे कारण दिले होते. यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
ते म्हणाले, “मला वाटते अनेक कारणांपैकी ते एक कारण असू शकते. हा प्रश्न केवळ निधीपुरता मर्यादित नसतो. विकास प्रकल्प, सामाजिक प्रश्न आणि सत्तेत किंवा विरोधात असण्याचाही परिणाम होत असतो. तसेच नेतृत्व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात कमी पडले, तर अशा घटना घडतात. राजकारणात प्रत्येक जण आपल्या भविष्यासाठी निर्णय घेत असतो. ज्या नेतृत्वाखाली आपण काम करतो ते आपले राजकीय भविष्य सुरक्षित करू शकत नाही, असे वाटल्यास पक्षांतर घडते.”
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या स्पष्ट विधानानंतर राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या बदलाच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.




