ताज्या बातम्या

आनंदी सेवानिवृत्त कर्मचारी हे जिल्हा परिषदेचे वैशिष्ट्य ठरावे- डॉ . प्रियाताई शिंदे

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषद मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्य सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण जावो, “‘आनंदी सेवानिवृत्ती’ ही सातारा जिल्हा परिषदेची योजना वैशिष्ट्य ठरावी असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी सातारा येथे केले.
सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आयोजित ‘आनंदी सेवानिवृत्ती’ कार्यक्रमानिमित्त त्या बोलत होत्या. या वेळेला
सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, अजित साळुंखे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी तसेच लेखाधिकारी समाधान चव्हाण व सेवानिवृत्त कर्मचारी कुटुंबासह उपस्थित होते.
या कार्यक्रमात एप्रिल, मे, जून व जुलै २०२६ या कालावधीत सातारा जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या २२२ कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती विषयक लाभांचे आदेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे १०, ग्रामपंचायत विभागाचे ११, आरोग्य विभागाचे १८, बांधकाम (उत्तर) विभागाचे ६, एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाचे ३, पशुसंवर्धन विभागाचे ७, अर्थ विभागाचा १, कृषी विभागाचे ३ तसेच शिक्षण (प्राथमिक) विभागातील १६३ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सातारा जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभाग सांभाळणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी प्रास्ताविक करून ‘आनंदी सेवानिवृत्ती’ उपक्रमाची माहिती दिली.
सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्व लाभ सेवानिवृत्तीपूर्वी देण्याबाबत अर्थ विभाग व सामान्य प्रशासन विभागामार्फत विविध विभागांना श्रीमती याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना देऊन पाठपुरावा केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष आभार मानले.
सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.राजूभैय्या भोसले यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या प्रदीर्घ व प्रामाणिक सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आनंदी सेवानिवृत्ती योजनेमुळे सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक सर्व लाभ सेवानिवृत्ती दिवशीच देत असल्याने प्रशासनाचे कौतुक केले व यापुढे देखील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सातारा जिल्हा परिषद नेहमी सकारात्म्क असेल असे सांगितले.
सातारा जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने श्रीमती शिवांजली प्रल्हाद साळुंके ,केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, वहागांव, ता. कराड तसेच श्रीमती राजश्री संभाजी कुंभार ,केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, गिरवी, ता. फलटण यांनी मनोगत व्यक्त केले . सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती अंजली गोडसे, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडाळ ता.जावली यांनी केले.

——————————————–

फोटो- सातारा जिल्हा परिषद आनंदीदायी सेवानिवृत्ती कार्यक्रमाला मान्यवर व कर्मचारी (छाया- अजित जगताप, सातारा )

Scroll to Top